भगवान परशुराम जन्मोत्सवनिमित्ताने सकल ब्राह्मण समाजाकडून भव्य दुचाकी फेरी संपन्न

पुणे, दि. १९ – पुणे शहरातील सुमारे ३५ विविध ब्राह्मण संस्था, संघटना यांनी आज एकत्रितपणे “सकल ब्राह्मण” समाजातर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने शनिवारवाडा ते केसरीवाडा दुचाकी फेरीचे आयोजन केले होते. या फेरीचा शुभारंभ आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर, स्वरदा बापट, स्वप्नाली पंडित, राघवेंद्र मानकर, कुणाल टिळक, उदय लेले तसेच महाराष्ट्र शासनाच्या “अमृत” संस्थेचे कार्यकारी संचालक विजय जोशी उपस्थित होते.

सर्व हिंदू समाजाला सोबत घेत सकाळी ९ वाजता शनिवारवाडा येथून दुचाकी फेरीचा प्रारंभ झाला. तत्पूर्वी कसबा गणपती मंदिरात आरती करुन व लालमहालातील छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांना अभिवादन करून फेरीचा शुभारंभ करण्यात आला. शनिवारवाडा येथून थोरले बाजीराव पेशवे पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. दुचाकी फेरी मार्गातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. यामध्ये जंगली महाराज रोडवरील झाशीची राणी लक्ष्मीबाई, डेक्कन जिमखाना येथे छत्रपती संभाजी महाराज, पुढे दांडेकर पूल चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सारसबाग कॉर्नर येथे स्वा. सावरकर, बाजीराव रोडवरील महात्मा बसवेश्वर व सार्वजनिक काका व शेवटी केसरीवाडा येथे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन दुचाकी फेरीची सांगता झाली. सकल ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी विश्वजीत देशपांडे, विश्वनाथ भालेराव, राजेंद्र कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी, मनोज तारे, राजेश कुलकर्णी,
मनोज पांचारिया, श्रीकांत जोशी, गिरीश शेवडे आदींनी या दुचाकी फेरीचे आयोजन केले होते.
——



