लेखापरीक्षक, वित्तीय रिपोर्टिंग संस्थांनी परस्परपूरक काम करण्याची गरज : नितीन गुप्ता
आयसीएआय'तर्फे 'क्रिएटिंग अ बेटर फिनान्शियल रिपोर्टिंग इकोसिस्टीम' वर कार्यशाळा

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) व राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण यांच्या पुढाकाराने ‘आयसीएआय’च्या सेंटर फॉर ऑडिट अँड क्वालिटी कमिटी आणि आयसीएआय पुणे शाखेच्या संयुक्त सहकार्याने आयोजित ‘क्रिएटिंग अ बेटर फिनान्शियल रिपोर्टिंग इकोसिस्टीम’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी गुप्ता बोलत होते. यावेळी ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए प्रसन्नकुमार डी., उपाध्यक्ष सीए मंगेश किनारे व्यासपीठावर उपस्थित होते. ‘एनएफआरआय’चे कार्यकारी संचालक श्याम टोंक व अरुण कुमार, सेंटर फॉर ऑडिट क्वालिटी कमिटीचे उपाध्यक्ष सीए प्रमोद जैन, ‘आयसीएआय’चे माजी अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए प्रणव आपटे, विभागीय समिती सदस्य सीए अभिषेक धामणे, सीए रेखा धामणकर, सीए राजेश अग्रवाल, पुणे शाखेचे उपाध्यक्ष सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नंदकुमार कदम, सीए सारिका दिंडोकार, सीए हृषीकेश बडवे, सीए प्रितेश मुनोत आदी उपस्थित होते.
नितीन गुप्ता म्हणाले, “देशाच्या आर्थिक विकासात चार्टर्ड अकाउंटंट्सची भूमिका महत्त्वाची असून, करप्रणाली आणि सार्वजनिक हितासाठीचे लेखापरीक्षण हे आर्थिक प्रगतीचे आधारस्तंभ आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, आगामी काळात ती जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भक्कम कॉर्पोरेट शिस्त आणि उच्च दर्जाची वित्तीय अहवाल प्रणाली आवश्यक आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवण्यासाठी दर्जेदार ऑडिट अत्यावश्यक असून, बाह्य लेखापरीक्षक हे सार्वजनिक हिताचे रक्षक आहेत. लेखापरीक्षकांनी योग्यवेळी त्रुटी निदर्शनास आणल्या, तर गुंतवणूकदारांना संभाव्य जोखमींची पूर्वकल्पना मिळते. अमेरिकेतील एन्रॉन, वर्ल्डकॉमसारख्या घोटाळ्यांनंतर तेथे सुधारणा करण्यात आल्या, तसेच भारतातही विविध आर्थिक घोटाळ्यांमधून शिकण्याची गरज आहे.”
देशात सुमारे १८.५ लाख कंपन्या असून त्यापैकी सुमारे ६ हजार सूचीबद्ध कंपन्या आहेत. वाढत्या भांडवली बाजारामुळे लेखापरीक्षण क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध असल्या तरी त्यासाठी उच्च दर्जाची ऑडिट गुणवत्ता आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
सीए प्रसन्नकुमार डी म्हणाले, “सनदी लेखापालांच्या व्यावसायिक गुणवत्तेला अधिक बळकटी देण्यासाठी सातत्याने कौशल्यविकास आवश्यक आहे. जनतेचा विश्वास टिकवणे हीच व्यवसायाची खरी ताकद आहे. आजच्या बदलत्या काळात केवळ ‘ट्रू अँड फेअर’ मत देणे पुरेसे नसून, भागधारकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ऑडिट आणि फॉरेन्सिक ऑडिटमधील फरक सर्वसामान्यांना समजत नसल्याने, चार्टर्ड अकाउंटंटकडून १०० टक्के अचूकतेची अपेक्षा ठेवली जाते. संस्थेने लेखांकन, लेखापरीक्षण तसेच फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिटसारखे नवे मानदंड विकसित केले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी ८०० हून अधिक कार्यक्रमांत ५० हजारांहून अधिक व्यावसायिकांनी सहभाग घेतला आहे. डिजिटल कॉम्पिटन्सी मॉडेल आणि ऑडिट क्वालिटी मॅच्युरिटी मॉडेल यांसारखे उपक्रमही राबविण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.



