लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नियोजनासाठी आढावा बैठक संपन्न

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी पुणे महानगरपालिकेच्या महापौर दालनात गुरुवारी आढावा बैठक पार पडली. जयंती सोहळा शिस्तबद्ध, भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपमहापौर परशुराम वाडेकर, सन्माननीय सभासद वृषाली रिठे व प्रियांका शेंडगे उपस्थित होत्या.
यावेळी पुणे शहर व जिल्हा मातंग समाजाचे सचिव दीपक कसबे, स्वागताध्यक्ष रविंद्र आरडे, पुणे शहर मातंग समाजाचे सचिव अॅड. महेश सकट यांच्यासह महापालिकेचे विविध विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. मुख्य अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर, उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त आशा राऊत, सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड, प्रकाश वालगुडे आणि शीतल वाकडे यांनी आपल्या विभागांच्या तयारीची माहिती सादर केली.
बैठकीत जयंतीनिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, विद्युत व्यवस्था तसेच नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा असून, कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.



