ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय!

Spread the love

पुणे (शशिकांत पाटोळे) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज गार्डन बोपोडी येथे आयोजित करण्यात आलेला ‘धम्मदीक्षा अनुकरण सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला बोपोडी आणि परिसरातील आबालवृद्ध बौद्ध बांधव व भगिनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित ह

सोहळ्याची सुरुवात भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून झाली. त्यानंतर उपस्थित पूजनीय भंते राजरतन व भंते संघपाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी सामूहिक त्रिशरण, पंचशील आणि बुद्धवंदना ग्रहण केली.

२५ डिसेंबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते धम्मभूमी देहूरोड या ठिकाणी बुद्धरूप स्थापन करण्यात आले. त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार समता सैनिक दलातील माजी सैनिक दिनकर दगडू पिसाळ यांच्यासह संतोष आल्हाट, शकुंतला ताई शेलार यांनी केलेल्या धार्मिक कार्याचा आढावा घेऊन धम्मचारी शरण्य व धम्मचारीणी शाक्यश्री यांचा धम्मकार्यातील केलेल्या योगदानाचे सन्मानचिन्ह पंचशील देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीताताई वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच उपासिका शकुंतला बाराथे, शशिकला कांबळे, अंकिता ढोणे, बोधाचार्य मनोहर शेलार, पत्रकार दत्ता सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते विजय ढोणे, विनोद रणपिसे, इंद्रजीत भालेराव बुद्धिस्ट सोशल ऍक्टिव्हिटी ग्रुपचे सुरेश ओव्हाळ, प्रतीक भोसले, तुषार गाडेकर, निलेश ओव्हाळ, विनीत जगदाळे, रमेश कांबळे, रवींद्र कदम, संदीप सोनवणे, आसिफ काझी, रामकुमार बनसोडे, रमेश गाडेकर, उमेश कांबळे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

१९५६ च्या नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाविधीचे अनुकरण करत उपस्थित सर्व भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे सामूहिक पठण केले आणि बौद्ध धम्माच्या तत्त्वांचे आचरण करण्याचा संकल्प केला.

या प्रसंगी आयोजित धम्मसभेत बोलताना प्रमुख वक्त्यांनी सांगितले की, “बाबासाहेबांनी दिलेली धम्मदीक्षा ही केवळ धार्मिक परिवर्तन नसून ती मानवी मूल्ये, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव देणारी सामाजिक क्रांती होती. बोपोडीसारख्या स्थानिक पातळीवर होणारे हे अनुकरण सोहळे तरुण पिढीला धम्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात.”

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बोपोडी परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि पंचशील ध्वज लावण्यात आले होते. सोहळ्यानंतर उपस्थित नागरिकांसाठी खीरदानाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील मुलांनी सादर केलेल्या भीमगीतांच्या कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण ‘भीममय’ आणि ‘धम्ममय’ झाले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्धिस्ट सोशल ऍक्टिव्हिटी ग्रुपचे स्थानिक उत्सव समितीचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आणि बोपोडीतील तरुण मंडळांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’ या धम्म प्रार्थनेने झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!