ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात माऊलींचा जन्मोत्सवाचे आयोजन
कृष्ण जन्म सोहळ्यात हरिनाम जयघोषात ज्ञानेश्वरी पारायण

वडमुखवाडीतील अखंड हरीनाम सप्ताहात महिलांचा कीर्तन महोत्सव रंगणार
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील वडमुखवाडीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट तर्फे ९ ते १६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांचे सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर आणि खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांनी दिली आहे.
कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्मोत्सव राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. महाराष्ट्र राज्य परिसरात ही मोठ्या प्रमाणात भाविक, भक्त, नागरिक शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जन्मोत्सव साजरा करणार आहे. या निमित्त वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन हरिनाम गजरात करण्यात आले आहे.
यामध्ये जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात शनिवारी ( दि. ९ ) हरिनाम गजरात होत आहे. या निमित्त श्रींची महापूजा अभिषेक, सकाळी आठ ते बारा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी बारा ते सायंकाळी सहा महिलांची भजने, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ, संध्याकाळी सात ते नऊ महिलांची कीर्तन सेवा रुजू होणार आहे. मंदिर परिसरातील महिला भजनी मंडळांनी भजनाचे कार्यक्रम सेवा रुजू होणार आहे.
सप्ताहाच्या काळात ह.भ.प. सुप्रियाताई साठे, सोनाली ताई फडके, विद्याताई रेपाळे, अनुराधाताई धोंडे, सविताताई काळजे , शितलताई गायकवाड यांची कीर्तन सेवा होणार आहे. तसेच चांगुणाताई चौधरी महाराज यांचे जन्माष्टमी दिनी कीर्तन होईल. ज्ञानेश्वरी ताई जगताप महाराज यांचे १६ ऑगस्ट रोजी काल्याचे किर्तन सकाळी दहा ते बारा या वेळेत होणार आहे. काल्याचा महाप्रसाद कोंडाबाई रामचंद्र गायकवाड यांच्या वतीने काल्याचा महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीकृष्ण जन्म आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्मोत्सव या निमित्त सायंकाळी सहा ते सात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेची दिंडी मिरवणूक, मंदिर प्रदक्षिणा होणार आहे. रात्री आठ ते नऊ या वेळात दीपोत्सव, रात्री दहा ते बारा या वेळेत जन्मोत्सवाचे कीर्तन होईल. थोरल्या पादुका मंदिर पंचक्रोशीतील सर्व महिला मंडळ व स्वकाम सेवेकरी यांनी भाविक नागरिकांना विशेष सेवा देणार आहेत. या धार्मिक पर्वणीस परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी केले आहे.