आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे प्रशांत कुऱ्हाडे पाटील विजयी
माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी रचला नवा इतिहास ; सर्वाधिक मताधिक्याने विजय

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे प्रशांत कुऱ्हाडे पाटील यांना १२ हजार ७२४ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रकाश कुऱ्हाडे पाटील यांना ६ हजार ३४ मते मिळाली. प्रशांत कुऱ्हाडे यांनी पहिल्या फेरी पासून आघाडी घेत दहाव्या फेरी अखेर ६ हजार ६९० मताधिक्याने विजय मिळवला. आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजप १५ , शिवसेना ४ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २ जागांवर उमेदवार विजयी झाले. या निकालाने आळंदी नगरपरिषदेवर भाजपची एक हाती सत्ता आल्याने भाजपने विजया नंतर जल्लोष केला. विजयी उमेदवारांनी जल्लोषात मिरवणुका काढून माऊली मंदिरात श्रींचे दर्शन घेतले. यावेळी आळंदी शहरातून फटाक्याची आतिषबाजी, गुलाब, भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत ढोल, ताशा तसेच घंटेचा ठणठणाट करीत दणक्यात उत्साही, आनंदी वातावरणात मिरवणूक काढल्या. यावेळी विजयी उमेदवारांचे समर्थकांनी जल्लोष करीत उमेदवारांचे अभिनंदन करीत विजयोत्सव साजरा केला.
नगराध्यक्ष पदाचे निवडणुकीत १९ हजार १६५ मते वैध ठरली. यात भाजपचे प्रशांत कुऱ्हाडे पाटील बहुमत मिळवित विजयी झाले. त्यांनी पहिल्या फेरी पासून शेवटच्या दहाव्या फेरी पर्यंत सर्व मतदान केंद्रावर आघाडी घेत विजय मिळविला. आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी प्रभाग क्रमांक १ ते १० मधील निवडणुकीचा निकाल जाहीर केला.
प्रभाग निहाय निकालांत भाजपच्या उमेदवारांनी मताधिक्याने विजय संपादन केला. प्रभाग २ (अ) मध्ये भाजपच्या वैजयंता अशोक उमरगेकर यांनी १८६२ मते मिळवत १५४८ मतांच्या आघाडी घेत नवा इतिहास रचला . नगराध्यक्ष पडण्याची परंपरा मोडीत काढत त्यांनी विजयाची परंपरा निर्माण केली. प्रभाग ५ ( ब ) भाजपच्या खुशी सागर बोरुंदिया यांनी १७०२ मते घेत १२९७ मतांची आघाडी घेतली. प्रभाग ८ ( अ ) मधून भाजपचे माजी उपनगराध्यक्ष सचिन रामदास गिलबिले ९६४ मतांच्या आघाडीने विजयी झाले. प्रभाग ७ ( ब ) मधून सुनील ज्ञानेश्वर घुंडरे ७२६ मतांनी विजयी झाले. प्रभाग ४ ( ब ) मध्ये भाजपचे गोविंदा उर्फ सागर कुऱ्हाडे ५५४ मते, प्रभाग ५ ( अ ) संतोष मारुती रासकर ५३३ मते, प्रभाग ६ ( अ ) मध्ये साक्षी अक्षय कुऱ्हाडे मते, प्रभाग ९ ( अ ) मध्ये माजी नगरसेवक दिनेश रामदास घुले ४३३ मते, प्रभाग २ ( ब ) मधून माजी उपाध्यक्ष रामचंद्र दत्तात्रय भोसले ३४९ मतांची आघाडी घेत विजय मिळवला.
प्रभाग १० ( ब ) भाजपच्या ऋतुजा अनिकेत तापकीर २३१ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या. प्रभाग ६ ( ब ) मध्ये हेमंत गुलाबराव कुऱ्हाडे १६८ मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला. प्रभाग ४ ( अ ) मध्ये कांचन किरण येळवंडे १५४ मतांची आघाडी, प्रभाग ३ ( अ ) मध्ये पूजा संजय घुंडरे ७५ मतांची आघाडी घेऊन कमी फरकाने विजय मिळवला. प्रभाग ३ ( ब ) मध्ये सोमनाथ कुंडलिक कुऱ्हाडे ५१ केवळ मतांची आघाडी घेत निसटता विजय मिळवला. प्रभाग ८ ( ब ) मध्ये भाजप उमेदवार सुजाता कालिदास तापकीर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी केली.
शिवसेना शिंदे गटाच्या चार जागा निवडून आल्या. या मध्ये प्रभाग १ ( अ ) मधून पती- पत्नी निवडून आले आहेत. ऋतुजा आदित्य घुंडरे ६०३ मतांची आघाडी घेतली. तर प्रभाग १ ( ब ) मध्ये आदित्य हनुमंत घुंडरे ५५७ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. प्रभाग १० ( अ ) मध्ये उद्योजक सुरेश खंडेराव झोंबाडे यांनी २५९ मतांची आघाडी घेऊन तिसर्या प्रयत्नात विजय संपादन केला. प्रभाग ७ ( अ ) मधून अरुणा ज्ञानेश्वर घुंडरे यांनी १२० मतांची आघाडी घेत विजय मिळवला. आळंदीतील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीला दोन जगावर समाधान मानावे लागले. यात प्रभाग १० ( क ) मध्ये उज्वला दीपक काळे यांनी ६९९ मतांची आघाडी घेतली. प्रभाग ९ ( ब ) मध्ये अर्चना विजय तापकीर यांनी केवळ २५ मतांची आघाडी घेत विजय मिळवला.
भाजपचे प्रशांत कुऱ्हाडे पाटील यांचे हाती आळंदीचे विकासाची धुरा मतदारांनी दिली आहे. नगराध्यक्ष पदांचे लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रकाश कुऱ्हाडे पाटील यांना ६ हजार ३४ मते मिळाली या शिवाय दोन अपक्ष उमेदवार होते. यात सुरेश दौंडकर यांना ६६ मते, उमेश डरपे यांना १४४ मते मिळाली. या शिवाय शिवसेना ( उबाठा ), काँग्रेस, यांनी देखील काही जागांवर निवडणूक लढविली. मात्र विजय संपादन करता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आळंदीत निवडणूक लढविली नाही.
काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि अपक्ष उमेदवारांना या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. या वेळी आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे आणि पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी वरिष्ठ पोलिस प्रशासनाचे मार्गदर्शनात बंदोबस्त तैनात करून शांतता सुव्यवस्थेचे काम पाहिले.
आळंदी नगरपरिषद पक्षीय बलाबल
नगराध्यक्ष – प्रशांत कुऱ्हाडे पाटील ( भाजपा )
पक्षनिहाय विजयी नगरसेवक
भाजप – १५
शिवसेना – ४
राष्ट्रवादी – २
एकूण जागा २१



