
पुणे . हटके म्युझिक ग्रुप यांची गीतरामायण सादरीकरणाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली आहे. यानिमित्त हटके गीत रामायण विश्वविक्रम सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हटके म्युझिक ग्रुपचे संचालक शिरीष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला संस्थेचे मान्यवर माधव धायगुडे, सुमेधा कुलकर्णी उपस्थित होते.
मुख्य कार्यक्रमात बाबुजींचे सुपुत्र संगीतकार व गायक श्रीधर फडके आणि गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी हटके ग्रुपचे सदस्य निवडक गीतरामायणातील काही गीते सादर करणार आहेत. हटके म्युझिक ग्रुप ची स्थापना २०१९ मध्ये शिरीष कुलकर्णी यांनी केली. नवोदित कलाकारांना मंच, संगीतीक व्यावसायिकांना प्रोत्साहन आणि संगीतातून आनंद हे त्रिसूत्री उद्दिष्ट घेऊन, ग्रुपने आजवर १०० हून अधिक आॅनलाईन आणि प्रत्यक्ष सादरीकरणांचे कार्यक्रम केले आहेत.
हटके म्युझिक ग्रुपच्या संगीतसेवेचे उपक्रम अत्यंत मनोभावे आणि सातत्याने पार पाडले आहेत. दि. २० एप्रिल २०२४ रोजी गीतरामायणातील संपूर्ण ५६ गीतांचे सलग आठ तास सादरीकरण विनामूल्य आणि सेवाभावातून करण्यात आले. त्यानंतर गीतरामायण महायज्ञ ५६ या उपक्रमाअंतर्गत हेच गीतरामायण ५६ वेळा विविध ठिकाणी देवालये, सेवाभावी संस्था, वृद्धाश्रम, आणि समाजासाठी कार्य करणा-या संस्थांमध्ये सादर करण्याचा संकल्प घेतला.
या प्रवासात महापर्व १ या स्वरूपात २० फेब्रुवारी ते १ मार्च २०२५ दरम्यान सलग दहा दिवस अलंकार सोसायटीच्या दत्त मंदिरात दररोज सकाळी एक पुष्प सादर करण्यात आले. त्यानंतर महापर्व २ अंतर्गत गुढीपाडव्यापासून श्रीराम नवमीपर्यंत (३० मार्च ते ६ एप्रिल २०२५) दोन देवस्थळांमध्ये दररोज दोन वेळा निवडक गीतरामायणातील गीतांचा गोडवा रसिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.