अलंकापुरीत अक्षरब्रम्हयोग ज्ञानेश्वरी पारायण सोहळा – दिव्य चरित्र चिंतन सोहळा
दोन हजारावर शिष्य परिवार सहभागी ; ३५० भाविकांची श्रीज्ञानेश्वरीची १०८ पारायण पूर्ण

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : महाकैवल्यतेजोनिधि संतसम्राट श्री ज्ञानोबारायांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सवा निमित्त तसेच गुरुनाम् गुरु ब्र. भू. विनायक नारायण जोशी म्हणजेच ब्र. भू. दादा महाराज साखरे यांच्या ८५ व्या पुण्यस्मरणा निमित्त साधकाश्रम श्रीक्षेत्र आळंदीत भव्य दिव्य ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीज्ञानराज माऊलींच्या चरित्र कथा निरूपणाचे आयोजन करण्यात आले असल्याचे राष्ट्रीय युवा कीर्तनकार यशोधन महाराज साखरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे महाकैवल्यतेजोनिधि संतसम्राट श्रीज्ञानोबारायांच्या अवताराला ७५० वर्षे पूर्ण होत आहेत.
ये मर्हाठियेचिया नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं । घेणें देणें सुखचिवरी । हों देईं या जगा ॥१२॥१६॥
अशी प्रतिज्ञा करणाऱ्या श्रीज्ञानराज माऊलींचा सप्तशतकोत्तर सुवर्ण अवतरण महोत्सवी वर्ष म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी भक्तां करता प्राप्त होणारा “भक्ती-ज्ञानाचा” सोहळा म्हणजे भव्य दिव्य पर्वणीच!
श्रीज्ञानराज माऊलींचा जन्मोत्सवी वर्ष आणि त्याचबरोबर प्राप्त झालेला आणखी एक सुवर्णयोग म्हणजे गुरुनाम् गुरु ब्र. भू. दादा महाराज साखरे यांचे ८५ वे समाधी महोत्सव ! माऊली ज्ञानोबाराय आणि श्री साखरे महाराज ही दोन नावे परस्पर इतकी निकट संबंधी वा एकरूप झालेली आहेत की, “श्रीज्ञानेश्वरी” हे नाव उच्चारल्या बरोबर श्री साखरे महाराज हेच नाव लक्षात येते. आणि श्री साखरे महाराज हे नाव उच्चारल्या बरोबर श्री ज्ञानेश्वरीचेच स्मरण होते. असा हा श्रीज्ञानेश्वरी या प्रसादिक ग्रंथाचा व श्रीगुरु साखरे महाराज संप्रदायाचा परस्पर संबंध सूर्यप्रकाशा प्रमाणे स्पष्टपणे सर्वत्र रूढ झाला आहे. त्याचे कारण म्हणजे या घराण्यावर ३५० वर्षांपूर्वी माऊलींचा झालेला साक्षात अनुग्रह होय.
या श्री सद्गुरू साखरे महाराज घराण्यात जन्माला आलेले दिव्य महापुरुष ज्यांनी आद्य गुरु शंकराचार्यांच्या भाष्यानुसार माऊली ज्ञानोबारायांच्या पाचही ग्रंथाला सार्थ करण्याचे दिव्य कार्य ज्यांनी केले ते म्हणजे गुरुनाम् गुरु ब्र.भू. विनायक नारायण जोशी तथा दादा महाराज साखरे.
ब्र.भू. दादा महाराजांना श्रीनाना महाराजां कडून माझ्या वडिलांची मिराशी गा देवा | या जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्ती प्रमाणे ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीच्या अध्ययन-अध्यापनाचा वारसा प्राप्त झाला, त्याच प्रमाणे श्रीक्षेत्र काशीला प.प. दक्षिणा मूर्ती स्वामीं कडून प्रस्थानत्रयी आचार्यांची भाष्य, त्याचबरोबर पंडित निश्चलदासजीकृत विचारसागर व वृत्तीप्रभाकराचे अध्ययन झाले, आणि ब्र.भू. दादा महाराजांनी वारकरी संप्रदायाला दोन डोळे दिले त्यामध्ये एक वेदांताचा डोळा म्हणजे ‘विचारसागर’ आणि एक न्यायाचा डोळा म्हणजे ‘वृत्तीप्रभाकर’ ! अशा महान विभूतीला ब्रह्मस्वरूप होऊन आज ८५ वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून अशा दिव्य महापुरुषांचे स्मरण म्हणजे वारकरी भक्त, साधकां करता दिव्य पर्वणीच आहे.
माऊलींचा सुवर्ण जन्मोत्सव व ब्र.भू. दादा महाराजांचे ८५ वे समाधी महोत्सवचे औचित्य साधून श्रीक्षेत्र आळंदी तील साधकाश्रम येथे याच संप्रदायांमध्ये सद्गुरुसेवेमध्ये आपले जीवन समर्पित केलेले प.पू. ह.भ.प. गुरुवर्य डॉ. श्री किसन महाराज साखरे यांनी हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्याचे ठरविले होते. परंतु नियतीपुढे कोणाचे चालत नाही. प.पू. गुरुवर्य महाराज ब्रह्मस्वरूप अवस्थेला प्राप्त झाल्यावर या जबाबदारीचा सर्वस्वी भार गुरुवर्य ह.भ.प. डॉ. यशोधनजी महाराज साखरे तसेच गुरुवर्य ह.भ.प. डॉ. चिदंबरेश्वरजी महाराज साखरे यांनी सर्वसाधारकांच्या प्रेमास्तव स्वीकारला आणि वैशाख वद्य पंचमी शनिवार दिनांक १७ मे २०२५ ते वैशाख वद्य द्वादशी शनिवार दि. २४ मे २०२५ या कालावधीत ‘साधकाश्रम’ श्रीक्षेत्र आळंदी (देवाची) येथे भव्य ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यास राज्यातून भाविक, वारकरी, साधक, शिष्य परिवार यांनी सहभागी होत उत्साही प्रतिसाद दिला आहे.
या कार्यक्रमांत चारही वेदांचे पारायण, सकल संतवांग्मयाचे पारायण, श्रीज्ञानराज माऊली चरित्र कथा, श्रीहरिकीर्तन आदी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायणा करिता संपूर्ण महाराष्ट्रातून २ हजारावर भाविकांनी सहभाग घेतला आहे. त्यापैकी ३५० भाविकांनी श्रीज्ञानेश्वरीची १०८ पारायण केलेली आहेत. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे माऊलींच्या सुवर्ण जन्मोत्सवी वर्षा निमित्त गुरुवर्य श्रीचिदंबरेश्वरजी महाराज साखरे यांच्या मुखारविंदातून माऊलींच्या चरित्राचे भावनिरुपण होणार आहे. श्री साखरे महाराज सांप्रदायिक पद्धतीने माऊलींच्या चरित्रातील संशयात्मक विषयांचे निराकरण करण्यात येणार आहे, ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीबरोबरच, अमृतानुभव, अभंग गाथा, चांगदेव पासष्टी, श्रीहरीपाठ, श्रीदासोपंतांची पासोडी, विवेकसिंधू, परमामृत, वेदेश्वरी, दासबोध, समर्थ गाथा, मनोबोध, एकनाथी भागवत, नाथांचा गाथा, नाथांचा हरिपाठ, चिरंजीवपद, श्रीतुकोबाराय गाथा, सकल संतगाथा, सोपानदेवी, सोपानदेव गाथा, श्रीतुकाराम महाराज स्तुती (निळोबारायकृत), श्रीतुकाराम महाराज चरित्र (महिपती महाराज), श्रीरामविजय, श्रीहरिविजय, भावार्थ रामायण, श्रीमद् भागवत, श्रीनिवृत्तीनाथ महाराज गाथा, श्रीनामदेव महाराज गाथा इत्यादी ग्रंथांचे सुद्धा स्वतंत्र पारायण होत आहे. या कार्यक्रमाचे दैनंदिनीत पहाटे ५ ते ६ काकडा भजन, ६ ते ६-३० श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्र, सकाळी ७ ते ११ श्रीज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते १२-३० गाथा पारायण, दुपारी ३ ते ५ श्रीज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा, संध्याकाळी ६ ते ७ श्रीहरिपाठ संध्याकाळी ७ ते ९ श्रीहरी कीर्तन, ९ ते ९-३० श्री शिवमहिम्नस्तोत्र होत आहे. पारायणास बसलेल्या भाविकांना वारकरी पोषाख आवश्यक असल्याने साधक निश्चित केलेल्या पोशाखात येत आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यातुन भाविक, भक्त, साधकांची उपस्थिती मिळाल्याने सोहळ्याचा आनंद द्विगुणीत झाला असून भाविकांनी उत्साही प्रतिसाद दिल्याने सोहळा यशस्वी होत आहे. श्रीगुरु साखरे महाराज शिष्यपरिवाराने परिश्रम पूर्वक नियोजन केले आहे.