आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाची तात्काळ कारवाईने आग आटोक्यात
द मून हाऊस इंटरनॅशनल प्री स्कूल येथे आग ; जीवित हानी टळली ; वित्त हानी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील द मून हाऊस इंटरनॅशनल प्री स्कूल साईराम डेव्हलपर्स, चऱ्होली खुर्द बायपास रस्ता येथे लागलेली आग आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाचे तात्काळ कारवाईने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. या आगीत जीवित हानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्त हानी होऊन घरातील सर्व साहित्य जळून गेले.
शुक्रवारी ( दि. ८ ) द मून हाऊस इंटरनॅशनल प्री स्कूल नरसिंग कोयले यांच्या मालकीचे घरामध्ये अचानक आग लागल्याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांनी आळंदी अग्निशमन विभागास कळविले. तात्काळ आळंदीतून अग्निशमन पथक आगीचे ठिकाणी पोहोचत परिश्रम पूर्वक आग वीजविण्यास यश मिळवले. आळंदी नगरपरिषद अग्निशमन विभागाचे वाहन व पथक घटनास्थळी आल्यावर आगीचा उगम दुसऱ्या मजल्या वरील किचन मध्ये असल्याचे निदर्शनास आले. जवळील इमारतीच्या टेरेस वरून खिडकीच्या काचा फोडून आग विझविण्याचे काम तात्काळ करण्यात आले. सुरुवातीला LPG गॅस सिलेंडरचा स्फोट होऊ नये यासाठी त्यावर पाणी फवारून आग आटोक्यात आणली. जवानांनी प्रचंड धाडस आणि समय सूचकता दाखवत दोन गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढले.
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन पथकाने कर्मचार्यांच्या परिश्रम पूर्वक नियोजनाने, धाडसी कार्य करीत आग कमी वेळात नियंत्रणात आणली: यासाठी आळंदी अग्निशमन दलातील लिडिंग फायरमन प्रसाद बोराटे, फायरमन अमित घुंडरे, सिध्दार्थ गावडे, साहिल काळे, वाहनचालक अजित कुऱ्हाडे, विनायक सोळंकी, विद्युत कर्मचारी दिगंबर कुऱ्हाडे, आरोग्य कर्मचारी सोमनाथ कांबळे यांनी आग विझविण्यास परिश्रम घेतले. या घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र घरातील सर्व जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, चऱ्होली अग्निशमन केंद्राचे कर्मचारी यांनी देखील आग विझवण्यास सहकार्य केले.