माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह व एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे डॉ. रामविलास वेदांती यांना भावपूर्ण श्रध्दांजली

पुणे, : माजी खासदार, रामजन्मभूमीचे आंदोलक व एमआयटी संस्थेचे शुभचिंतक डॉ. रामविलास वेदांती (६७) यांचे सोमवार, १५ डिसेंबर रोजी निधन झाले. यांच्या निधानानंतर माईर्स एमआयटी विश्वशांती केंद्र (आळंदी) परिसर विकास समिती, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
माईर्स एमआयटी विश्वशांती केंद्र (आळंदी) परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष व डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. तसेच संस्थेच्या वतिने माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी व डायरेक्टर डॉ. महेश थोरवे हे अयोध्या येथे जाऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करणार आहेत.
डॉ. रामविलास वेदांती यांचे गेल्या १५ वर्षापासून एमआयटी शिक्षण संस्थेशी घनिष्ठ संबंध होते. त्यांनी सतत एमआयटीच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन केले. तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज, तत्वज्ञ संत श्री तुकाराम महाराज व महाराष्ट्रातील अन्य संतांच्या प्रति त्यांची आस्था होती. माईर्स संस्था द्वारा बद्रिनाथ येथील माणा गावात बांधण्यात आलेल्या श्री सरस्वती मंदिरापासून ते मराठवाडा येथील रामेश्वर गांवापर्यंत संस्थेचे अनेक मंदिर आणि वास्तू आहेत. यांच्या निर्मितीसाठी डॉ. वेदांती यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळण्याचे सौभाग्य मिळाले आहे.
या प्रसंगी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“मानवतातीर्थ रामेश्वर रुई येथे उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिराची स्थापना करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. ते अतिशय निर्मळ, प्रांजळ आणि उच्च कोटीचे रामकथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. चेहर्यावर सदैव हास्य ठेवून ते आयुष्य जगले. त्यांच्या अचानक जाण्याने संस्थेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
प्रा.डॉ. रत्नदीप जोशी म्हणाले,“ ज्यांच्या नावातच प्रभू श्रीराम आणि दिलेला शब्द पाळण्याची वचनबद्धता हे वेदांचे सर आहे. व्हिजनवासातील रामलल्ला यांचे भव्य मंदीर व्हावे या ध्येयाने प्रेरित होऊन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला गती देणार्या आणि ती संकल्पपूर्ती करणार्या डॉ. वेदांती यांना माईर्स एमआयटीसंस्थे तर्फे श्रध्दांजली.”
या वेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.



