ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव २०२५ चे आयोजन २६ व २७ जून रोजी

पुणे, : पुण्यातील सृजन फाऊंडेशन व नांदेड सिटीच्या वतीने येत्या गुरुवार दि. २६ जून व शुक्रवार दि. २७ जून रोजी १४ व्या ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर या ठिकाणी दोन्ही दिवस सायं ५ ते ८ या वेळेत महोत्सव संपन्न होणार असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे मुख्य आयोजक असलेल्या अधीश प्रकाश पायगुडे यांनी कळविली आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना अधीश पायगुडे पुढे म्हणाले की, “मराठी शास्त्रीय संगीत आणि नाट्य संगीत क्षेत्रातील एक असामान्य कलाकार म्हणून आपण सारेच विदुषी ज्योत्स्ना भोळे यांना ओळखतो. ज्योत्स्नाबाईंनी बालगंधर्व आणि मास्टर दीनानाथ यांच्या नंतर नाट्य संगीतामध्ये केलेली कामगिरी आजही रसिक प्रेक्षकांसोबतच जाणकार व समीक्षक अशा सर्वांना भुरळ घालणारी असल्याने १९३०- ४० चा काळ या गुणी कलाकाराने आपल्या प्रतिभाशाली आवाजाने खऱ्या अर्थाने गाजविला. अशा ज्योत्स्ना भोळे यांना सांगीतिक मानवंदना देण्याच्या हेतूने सृजन फाऊंडेशन गेली १५ वर्षे ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवचे आयोजन करीत आहे.”
यावर्षी दोन सत्रांमध्ये महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार २६ जून (सायं ५ वाजल्यापासून) रोजी महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन होईल. यानंतर पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे शिष्य असलेले एस. आकाश (बासरी) आणि पं. मिलिंद रायकर याचे शिष्य असलेले यज्ञेश रायकर (व्हायोलिन) यांची बासरी व व्हायोलीन जुगलबंदी रंगेल. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने होईल.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (२७ जून) शास्त्रीय संगीतातील तीन घराण्यांचा संगम साधणाऱ्या ‘परंपरा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. यामध्ये कुमार गंधर्व यांच्या कन्या विदुषी कलापिनी कोमकली, किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी आणि पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं. शौनक अभिषेकी आपल्या घराण्याची गायकी रसिक प्रेक्षकांसमोर सादर करतील. मंगला खाडिलकर आणि रविंद्र खरे हे महोत्सवाचे सूत्रसंचालन करतील.