मनोरंजनमराठी

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य संवाद आणि संघर्षाचे प्रतीक : डॉ. श्रीपाल सबनीस

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे भीमराव पाटोळे यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव

Spread the love

बहुसंस्कृतीचे आव्हान पेलण्याची ताकद अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज यांचे संतत्व, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, स्वातंत्र्य यांचा जागर करत बहुसंस्कृतीत एकात्मता जागविणारे साहित्य अण्णा भाऊ साठे यांनी निर्माण केले. त्यांच्या साहित्यकृती संवाद आणि संघर्षाच्या प्रतीक आहेत. बहुसंस्कृतीचे आव्हान पेलण्याची ताकद त्यांच्या साहित्यकृतींमध्ये होती. अण्णा भाऊंचे कर्तृत्व देश-धर्म-पंथाच्या सीमा ओलांडून विश्र्वात्मक मानदंड निर्माण करणारे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. अण्णा भाऊंना वंदनीय मानून जात-धर्म-पंथाच्या सीमा ओलांडून जगण्याची भूमिका भीमराव पाटोळे यांनी आपल्या साहित्यकृतीतून मांडली आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरवही केला.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे ज्येष्ठ साहित्यिक भीमराव पाटोळे यांच आज (दि. ३०) समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड, माजी नगसेविका लता राजगुरू, विशाला पाटोळे मंचावर होते. शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. दीप्ती पाटोळे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, बहुधार्मिक समाजाचे एकात्म चित्रण, स्वातंत्र्याचा जागर अण्णा भाऊंच्या शाहिरीत प्रकर्षाने दिसतो. भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीचा मिलाफ करत विचारधारेचे वेगळेपण जपत अण्णा भाऊ साठे यांनी एकात्म मानवता समाजापुढे मांडली. ते संवादी लेखक होते.

सत्काराला उत्तर देताना भीमराव पाटोळे म्हणाले, दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी निर्माण केलेल्या साहित्यकृती या चमत्कार आहेत. त्यांना भारतरत्न हा किताब मिळावा यासाठी मी प्रयत्नशील आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्रमोद आडकर यांनी तर सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भीमराव पाटोळे लिखित ‘ना खेद ना खंत’ या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात बाळासाहेब शिवरकर, ॲड. दीपक मानकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले, अजय पाटोळे यांचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!