ताजा खबरब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

भीमथडीत महिला बचत गटांचा कास्टिंग पंच! केवळ खरेदीच नाही, तर संस्कृतीचेही दर्शन

Spread the love

पुणे:23डिसेंम्बर:-थंडीचा कडाका आणि जोडीला भीमथडी जत्रेचा उत्साह हे समीकरण पुन्हा एकदा पुण्यात पाहायला मिळत आहे. अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व शारदा महिला संघ शारदानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भीमथडीच्या आजच्या 4 थ्या दिवशीही पुणेकरांचे पाय भीमथडीकडे वळले. भीमथडी जत्रेत ‘बचत गटांच्या स्वयंसिद्धा विभागात पुणेकर रेंगाळताना दिसत आहेत. ग्रामीण संस्कृती, अस्सल चव आणि महिलांच्या कष्टाला मिळणारा सन्मान म्हणजे भीमथडी जत्रा. यंदा खाद्यपदार्थांपासून ते हँडमेड वस्तूंपर्यंत प्रत्येक स्टॉलवर काहीतरी खास पाहायला मिळत आहे.

पारंपारिक वस्त्रांची आणि हस्तकलेची जादू विवध स्टॉलवर दिसत आहे. ‘समर्थ महिला बचत गटा’च्या कॉटन आणि इकत साड्यांना मोठी मागणी आहे. तर ‘दुर्गामाता’ आणि ‘कोरवी फाऊंडेशन’च्या स्टॉलवरील हँडमेड गोधडी आणि रजई पाहण्यासाठी गर्दी होत आहे. जुन्या साड्यांचा पुनर्वापर करून बनवलेल्या पर्स, ‘निशिगंधा’ गटाचे खण आणि इरकली कापडाचे कॉईन पाऊच महिलांच्या पसंतीस उतरत आहेत.
याशिवाय ‘सई कला पैठणी’, ‘खादी ग्रामोद्योग’चे शर्ट्स आणि जॅकेट्स, तसेच ‘आदिवासी महामंडळा’चे बांबू तोरण आणि वारली पेंटिंगच्या साड्यांनी जत्रेची शोभा वाढवली आहे. ‘गोंड आर्ट’च्या बॅग्ज आणि कॅनव्हास पेंटिंग हे कलाप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
भीमथडी म्हटलं की अस्सल गावरान चव खवय्यांची चंगळ हे समीकरण खाऊ गल्लीत बघायला मिळत आहे.

 

भीमथडीत यंदा उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांची रेलचेल आहे. ‘स्वामिनी’ आणि ‘कपिलेश्वर’ यांसारख्या अनेक बचत गटांनी नाचणी पापड, कुरडई, सांडगे, आणि बटाटा वेफर्सचे स्टॉल्स सजवले आहेत. बारामतीच्या ‘एडीटी (ADT) मिलेट युनिट’चे मिलेट कुकीज, रॅगी लाडू आणि ग्लूटेन-फ्री प्रीमिक्स आरोग्याबाबत जागरूक असलेल्या पुणेकरांच्या पसंतीस उतरत आहेत. कोल्हापुरी मसाले, भिवापुरी मिरची, आणि लोणच्यांच्या बरण्यांनी जत्रेत खमंग सुवास दरवळत आहे. विशेष म्हणजे ‘शबरी आदिवासी महामंडळा’चे महुवा लाडू, महुवा जॅम आणि शुद्ध मध हे यंदाचे ‘बेस्ट सेलर’ ठरत आहेत.
टाकाऊतून टिकाऊ आणि ‘इको-फ्रेंडली’ ट्रेंड

पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे अनेक स्टॉल्स यंदा लक्ष वेधून घेत आहेत. ‘मिट्टी हब’ (माया माती) यांनी चक्क गाईच्या शेणापासून बनवलेली पेटंट मिळवलेली ‘गादी’ (Mattress), दिवे आणि नेमप्लेट्स सादर केल्या आहेत. ‘इन्फंट इंडिया’ या एचआयव्ही (HIV) बाधित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने बनवलेले द्राक्षाच्या आकाराचे हँडवॉश आणि लिपबाम खरेदी करून नागरिक सामाजिक भान जपत आहेत.
दागिन्यांचा साज आणि लाकडी कलाकृती साठी

तरुणींची गर्दी ज्वेलरी सेक्शनमध्ये आहे. ‘अद्वैत परिवार’ आणि ‘यशराकन्या’ ज्वेलरीच्या स्टॉलवर कोल्हापुरी साज, ठुशी, बोरमाळ आणि हँडमेड नेकलेसची क्रेझ आहे. कोल्हापुरी चपला, लाकडी खेळणी, आणि चामड्याच्या वस्तू घेण्यासाठीही झुंबड उडाली आहे. दगडी पाटा-वरवंटा, खलबत्ता आणि मातीची भांडी खरेदी करून अनेक जण आपल्या स्वयंपाकघराला पारंपारिक लूक देत आहेत.

दिव्यांग आणि आदिवासी महिलांची गगनभरारी
यंदाच्या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘दिव्यांग शिक्षण स्वयंसेवी ट्रस्ट’ आणि ‘मूकबधिर’ मुलांनी बनवलेल्या वस्तू. त्यांनी बनवलेले मॅग्नेट स्टिकी नोट्स, पेंटिंग्ज आणि वारली आर्ट पाहून पुणेकर थक्क होत आहेत. गडचिरोली आणि नागझिरा अभयारण्यातील आदिवासी महिलांनी बनवलेल्या डिंक लाडू आणि वनौषधींनाही मोठी मागणी आहे.
थोडक्यात, सुई-दोऱ्यापासून ते नाचणीच्या पापडापर्यंत आणि फॅशनेबल जॅकेट्सपासून ते गावरान तुपापर्यंत सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध करून देणारी ही भीमथडी जत्रा म्हणजे महिला सक्षमीकरणाचा एक उत्तम सोहळा ठरत आहे, आणि त्यामुळेच भीमथडीत केवळ खरेदी नाही, तर संस्कृतीचे दर्शन घडत आहे.
जास्तीत जास्त पुणेकरांनी भिमथडीला भेट द्यावी असें आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे www.bhimthadijatra.com या वेबसाईटवर पुढील 2 दिवसाचे ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!