व्यावहारिक उपयुक्तेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अंतर्भाव करावा : भूपेश गहोत्रा
एमआयटी डब्ल्यूपीयूत विश्वनोव्हा २०२६चे आयोजन

पुणे, ८ मेः ” व्यावहारिक उपयुक्तता वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अंतर्भाव करणे हे आधुनिक युगात अपरिहार्य झाले आहे. मानवी क्षमतांना डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देऊन कामे अधिक अचूक, जलद आणि कार्यक्षम बनविता येतात.” असे विचार भूपेश गहोत्रा यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या ‘विश्वनोव्हा २०२६’ या ऐतिहासिक बौद्धिक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी अॅक्सेचरचे व्यवस्थापकीय संचालक भूपेश गहोरोत्रा प्रमुख पाहुणे आणि सीगेट टेक्नोलॉजीचे कृष्णकुमार माधवन हे सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित होते.
तसेच डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू व विश्वनोव्हाचे मुख्य संयोजक डॉ. मिलिंद पांडे, इनोव्हेशनचे डीन डॉ. गणेश काकंडीकर, आयआयसीच्या संयोजक प्रा.डॉ.दिपाली जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.
यामध्ये देशभरातून ७००हून अधिक संघांनी नोंदणी करुन ३ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या तीन विजेत्यांना
अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार रुपयांचे पुरस्कार वितरण करण्यात आले. तसेच
दहा उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भूपेश गहोत्रा म्हणाले,”कृत्रिम बुद्धिमत्तेचा अंतर्भाव केवळ तांत्रिक प्रगती नसून ती व्यवसायांची चपळता आणि जीवनाचा दर्जा उंचावण्याची एक प्रक्रिया आहे. डेटा सुरक्षा आणि नैतिकतेचा विचार करुन याचा वापर केल्यास अधिक शाश्वत आणि प्रगत भविष्य घडविता येते.”
कृष्णकुमार माधवन म्हणाले,” उद्योन्मुख तंत्रज्ञान जसे की कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ब्लॉकचेन आणि जैवतंत्रज्ञान हे भविष्यातील मानवी जीवनात क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य ठेवतात. तंत्रज्ञानाचा वापर करतांना जबाबदारीने आणि नैतिकतेने करणे अत्यंत महत्वाचे आहे.”
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,” या स्पर्धेत सहभागी हेच भारताचे खरे भविष्य आहे. राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रकल्प आधारित शिक्षण आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनांच्या माध्यमातून युवा पिढीला सतत प्रोत्साहित करावे. ”
डॉ गणेश काकंडीकर म्हणाले,” या उपक्रमाच्या माध्यमातून व्यावसायिकांमध्ये संशोधन, स्टार्टअप्स आणि तांत्रिक प्रगतीची संस्कृती अधिक बळकट होईल. युवकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे समाजासाठी उपयुक्त अशा प्रभावी उपयांमध्ये रुपांतर करण्यास प्रेरित केले जात आहे. सर्जनशीलता, सहकार्य आणि उद्योजकतेच्या दृष्टिकोनाद्वारे भविष्यातील नवप्रवर्तक बनविण्याचा आत्मविश्वास आहे.”
डॉ दिपाली जवळे म्हणाल्या,” विद्यार्थ्यांची प्रतिभा, नावोपक्रम आणि समस्या सोडविण्यासाठी कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे आहे. हा उपक्रम तांत्रिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये योगदान देणार्या कल्पनांना विकसित करतो. भविष्यातील नवोन्मेषकांना घडवण्यात आणि अंमलबजावणी आधारित नवोन्मेषणाच्या संस्कृतीला चालना देण्यात महत्वपूर्ण आहे.”
कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनुराधा कानडे, सहसंयोजक डॉ. शमिष्ठा देसाई व डॉ. सुमित्रा मोताडे हे होते.
‘विश्वनोव्हा २०२६’ अंमलबजावणीवर भर देणारी
प्रकल्प आधारित शिक्षण पद्धतीसाठी ओळखल्या जाणार्या ‘विश्वनोव्हा २०२६’ केवळ कल्पनांवर नाही तर अंमलबजावणीवर भर देऊन पारंपरिक हॅकेथॉनच्या पलीकडे जाऊन काम केले. यामध्ये टेक्निकल आयरोनी, वेक्टर, हॅकहर, ड्युओ, सोल्डर अँड फॉरगेट आणि ऑटोमॅटिक चिक्स ब्रूडर यांसारख्या उत्कृष्ट कामगिरी करणार्या संघांनी या कार्यक्रमात सादर झालेल्या नाविन्याची खोली दाखवून दिली.



