पुणे: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यामध्ये येत्या शनिवारी (ता. ६ जून) ‘शक्ती समिट २०२६’, उद्योजकता परिषद होत आहे. राज्याचे सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हेही यावेळी उपस्थित असणार आहेत. हिंदू इकॉनॉमिक फोरम (एचईएफ) पुणे जिल्हा चॅप्टरतर्फे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने उद्या शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० या वेळेत पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये (पीआयसी) ही परिषद होणार आहे, अशी माहिती फोरमच्या पुणे जिल्हा चॅप्टरचे अध्यक्ष गौरव त्रिपाठी यांनी दिली.
गौरव त्रिपाठी म्हणाले, “अंदमान अँड निकोबारचे नायब राज्यपाल लेफ्ट. जनरल (निवृत्त) ए. के. सिंग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशनच्या नियामक मंडळाचे सदस्य दीपक करंजीकर, वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक व चेअरमन परमपूज्य स्वामी विज्ञानानंद, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या श्वेता शालिनी यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. परिषदेमध्ये संरक्षण व अंतराळ क्षेत्रावरील सत्रात ‘रेअर अर्थ’चे भू-राजकीय महत्त्व, संरक्षण क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि बदलते युद्धतंत्र यांवर चर्चा होणार आहे. ‘अश्विनी मॅग्नेट्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम धूत, अलिकॉन कास्टअलॉयचे हर्षवर्धन गुणे, आर्मामेंट अँड कॉम्बॅट इंजिनिअरिंगचे महासंचालक डॉ. प्रतिक किशोर, एमसीसीएआय’च्या संरक्षण व उच्च शिक्षण समितीचे संचालक प्रशांत जोगळेकर, ब्रिगेडियर वीरेश श्रीवास्तव आणि गोदरेजचे माजी व्यवसाय प्रमुख सुरेंद्र वैद्य मार्गदर्शन करणार आहेत.”
‘विकसित भारत’ मोहिमेत संरक्षण व अंतराळ क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची भूमिका या विषयावर होणाऱ्या चर्चेत वरुण खंदारे, किरण जाधव (अक्युरेट कंट्रोल्स), रावळनाथ शेंडे (श्री रेफ्रिजरेशन), अजय भागवत (रेणू इलेक्ट्रॉनिक्स) आणि चेतन धारिया (अनंत डिफेन्स) सहभागी होणार आहेत. रेल्वे व पायाभूत सुविधा क्षेत्रावरील सत्रात महाराष्ट्र मेट्रो रेलचे डॉ. हेमंत सोनवणे, क्रिसचे कार्यकारी संचालक सुमित गर्ग आणि आरडीएसओचे अरुण कुमार उद्योग क्षेत्रातील संधींवर भाष्य करणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एकात्मिक तंत्रज्ञान सत्रात डीआरडीओ अध्यक्षांचे तंत्रज्ञान सल्लागार मनीष भारद्वाज, ‘इंटेलिमेंट’चे प्रमुख प्रशांत पानसरे आणि ‘अॅक्टीन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास महाजन हे डिजिटल परिवर्तन, एआय आणि इंटरनेट ऑफ थिंग्जच्या बदलत्या परिदृश्यावर मार्गदर्शन करणार आहेत. हिंदू मंदिरांचे अर्थकारण या सत्रात लेखिका शेफाली, गिरीश कुलकर्णी आणि प्रशांत सचान धार्मिक पर्यटन, संस्कृती आणि रोजगारनिर्मिती यांवरील संधींवर चर्चा करणार आहेत.
‘ज्ञान, माध्यम आणि कथानक शक्ती’ या विषयावरील परिसंवादात डॉ. आशिष कुलकर्णी, कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी, प्रसन्न जोशी आणि शहजाद पूनावाला सहभागी होणार आहेत. ‘एआय इन एज्युकेशन, जर्नालिझम अँड गव्हर्नन्स’ या विषयावरील चर्चेत अनुराग तिवारी, अनुपमा बस्रूर आणि जीटी सहभागी होणार असून शिक्षण, पत्रकारिता आणि प्रशासन क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराबाबत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय शहरी विकास, औद्योगिक पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, विकास मार्गिका आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन या विषयांवरही स्वतंत्र परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी ‘शक्ती स्टार्टअप शोकेस’चे आयोजन करण्यात आले असून संरक्षण, नागरी तंत्रज्ञान, माध्यम तंत्रज्ञान आणि डीप-टेक क्षेत्रातील नवउद्योजकांना आपले प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे.
‘शक्ती समिट’ मधून प्रत्यक्ष भागीदारी, गुंतवणुकीच्या संधी, स्टार्टअप नेटवर्किंग, क्षेत्रनिहाय सहकार्य आणि दीर्घकालीन आर्थिक संस्था निर्माण होण्याची अपेक्षा आहे. भविष्यात ‘शक्ती समिट’ला वार्षिक प्रमुख परिषद म्हणून विकसित करण्याबरोबरच व्यवसाय सहकार्य, भांडवली उपलब्धता, युवा सहभाग आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संपर्क यासाठी सातत्यपूर्ण व्यासपीठ उभारण्याचा फोरमच्या पुणे जिल्हा शाखेचा मनोदय असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.
Post Views: 7