आलंदीमराठीशहर

आळंदी हे लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान – इंद्रायणीच्या प्रदूषणाचा ऐरणीवर

आळंदीतील इंद्रायणी नदी प्रदूषण गंभीर ; वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ थांबवा चंद्रकांत वारघडे यांची मागणी

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र आळंदी नगरीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. एकादशी दिनी आळंदीत दर्शनासाठी आले असता, नदीपात्रात पाय धुण्यासाठी गेलो असता पाण्यातून अत्यंत उग्र दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. याच प्रदूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्यात अनेक वारकरी व भाविक श्रद्धेने स्नान करत होते, हे अधिक चिंताजनक आहे.

“वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीत येतो, आजार घेऊन परत जाण्यासाठी नाही!” – महाराष्ट्रभरातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

या संदर्भात माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्हाधिकारी, पुणे धर्मादाय आयुक्त, आळंदी देवस्थान ट्रस्ट आणि आळंदी नगरपरिषद, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांना निवेदन देऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे.

प्रशासनाकडे ९ प्रमुख मागण्या:

१. नदीपात्राजवळ मराठीत स्पष्ट, मोठ्या अक्षरात – “या पाण्यात स्नान करू नये, पाणी अंगावर घेऊ नये” – असे सूचना फलक लावावेत.
२. गर्दीच्या काळात घाटावर सुरक्षा कर्मचारी / प्रशिक्षित स्वयंसेवक नियुक्त करून भाविकांना धोकादायक ठिकाणी स्नान करण्यापासून रोखावे.
३. वारकऱ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित पाण्याची स्वतंत्र स्नान व्यवस्था करावी.
४. इंद्रायणीच्या पाण्याचे अधिकृत प्रयोगशाळेत तातडीने परीक्षण करून अहवाल सार्वजनिक करावा.
५. नदीत रासायनिक, औद्योगिक किंवा सांडपाणी सोडले जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
६. प्रदूषणाच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी सर्व विभागांची संयुक्त पाहणी व चौकशी समिती स्थापन करावी.
७. भाविकांसाठी आवश्यक वैद्यकीय व आरोग्य सुविधा घाट परिसरात उपलब्ध कराव्यात.
८. आळंदी देवस्थान ट्रस्टने स्वच्छता, पाणी व सुरक्षेसाठी योग्य निधी उपलब्ध करावा.
९. सर्व संबंधित विभागांची तातडीने संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करावी.

“वारकऱ्यांची श्रद्धा ही त्यांची कमजोरी नसून महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्या श्रद्धेचा आदर राखून सुरक्षित सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे वारघडे यांनी म्हटले आहे.

तातडीने कारवाई न झाल्यास वारकरी बांधव, भाविक आणि नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही व संवैधानिक मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!