पाचवी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा !!
द किंग्ज्मन, ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लब संघांची विजयी कामगिरी !!

पुणे, १९ ऑगस्टः स्पार्टन क्रिकेट क्लब पुणे यांच्या तर्फे आयोजित पाचव्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत द किंग्ज्मन आणि ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून तिसरा विजय मिळवला.
सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये चेतन वर्मा याने केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे द किंग्ज्मन संघाने कॅप क्रुसडर्स संघाचा २ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कॅप क्रुसडर्स संघाचा डाव १८.३ षटकात १३५ धावांवर आटोपला. आदित्य साखरदंडे (३२ धावा) आणि शाम बिष्णोई (२४ धावा) यांनी संघाचा डाव बांधला. किंग्ज्मन संघाच्या चेतन वर्मा याने ३५ धावांमध्ये ४ गडी बाद करून प्रतिस्पर्धी संघाच्या डावाला खिंडार पाडले. दुसऱ्या बाजुने गौरव राठोड आणि कृणाल गव्हाळे या दोघांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे लक्ष्य द किंग्ज्मन संघाने १९.५ षटकात व ८ गडी गमावून पूर्ण केले. शुभम राठोड याने नाबाद ४८ धावांची खेळी केली. सुश्रूत परचुरे (१८ धावा), विश्वेश पनवर (१७ धावा) आणि चेतन वर्मा (नाबाद १०) यांची उपयुक्त धावा जमवून संघाचा विजय निश्चित केला.
अनिल डोमकावळे याने केलेल्या अचूक गोलंदाजी आणि नीरज शर्माच्या उपयुक्त धावांच्या जोरावर ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबने रियुनायटेड क्रिकेट क्लबचा ६ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळणाऱ्या रियुनायटेड क्रिकेट क्लबने १४४ धावा धावफलकावर लावल्या. रोहीत जाधव (नाबाद ३६ धावा) आणि निखील कदम (२८ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. फिरकीपटू अनिल डोमकावळे याने २२ धावांमध्ये चार गडी बाद करून रियुनायटेड संघाच्या डावाला वेसण घातली. हे आव्हान ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबने १३.२ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. नीरज शर्मा याने ३४ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४६ धावा तर, जय ढोले याने नाबाद ३८ धावांची खेळी करून संघाचा विजय निश्चित केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
कॅप क्रुसडर्सः १८.३ षटकात १० गडी बाद १३५ धावा (आदित्य साखरदंडे ३२, शाम बिष्णोई २४, चेतन वर्मा ४-३५, गौरव राठोड २-२२, कृणाल गव्हाळे २-३३) पराभूत वि. द किंग्ज्मनः १९.५ षटकात ८ गडी बाद १३६ धावा (शुभम राठोड नाबाद ४८, सुश्रूत परचुरे १८, विश्वेश पनवर १७, चेतन वर्मा नाबाद १०, आदित्य साखरदंडगे ४-२२); सामनावीरः चेतन वर्मा;
रियुनायटेड क्रिकेट क्लबः २० षटकात ७ गडी बाद १४४ धावा (रोहीत जाधव नाबाद ३६, निखील कदम २८, अनिल डोमकावळे ४-२२) पराभूत वि. ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबः १३.२ षटकात ४ गडी बाद १४५ धावा (नीरज शर्मा नाबाद ४६ (३४, ४ चौकार, २ षटकार), जय ढोले नाबाद ३८, अभिजीत बाबरदेसाई ३-१७); सामनावीरः अनिल डोमकावळे.