आळंदी – देहूत इंद्रायणी नदीला महापूर ; अलंकापुरीत नदीचे दुतर्फ़ा रहदारी बंद

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : देहू – आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला महापुर आल्याने आळंदी पोलीस आणि आळंदी नगरपरिषद, आपत्ती नियंत्रण विभागाने दक्षता घेत सुरक्षात्मक उपाय योजना जनजागृती करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आळंदी बस स्थानक जवळील जुना दगडी पूल, गोपाळपूर येथील नवा पूल महापुराचे पाण्यामुळे दक्षता घेत वापरास बंद करण्यात आले आहे. भक्ती सोपान पुला आणि स्काय वॉल्क सुरुवातीस महापुराची पाणी असल्याने रहदारीला बंद ठेवण्यात आले आहेत. देहूतील जुना धोकादायक दगडी पूल देखील वापरास बंद ठेवण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी सांगितले.
इंद्रायणी नदीचे पाणलोट आणि लाभ क्षेत्रात होत असलेल्या पावसाने इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. आळंदी पावसाचा जोर कमी झाला असून वरील पावसाचा अंदाज घेत धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचे पाणी आणि धरणातून येणारा येवा याचे सुसंवादातून पै खाली सोडण्याचे नियोजन केले जात आहे. पावसाचे पाण्याने इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. इंद्रायणी नदीचे दुतर्फ़ा परिसरातून नागरिकांनी महापुराचे पाणी पाहण्यास मोठी गर्दी केली. सेल्फी घेतले. चाकण चौक, नृसिह सरस्वती स्वामी महाराज चौक येथील नवीन पूल, सिद्धबेट जवळील नवीन पूल, जुना दगडी पूल सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नदी घाटाकडे जाणारे सर्व मार्ग, जुनी नगरपरिषद चौक, महाराष्ट्र बँक, पान दरवाजा, शनी मंदिर, झाडी बाजार पार्किंग, इंद्रायणी नगर कमान, विश्वशांती केंद्र हवेली बाजू घाट या सर्व ठिकाणी बेरिकेटिंग करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. मुख्याधिकारी आणि आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी नदीचे दुतर्फ़ा घाटावर, पुला चे परिसरात भेट देत पाहणी केली. संबंधित विभागास तैनात करीत नदीचे दुतर्फ़ा पोलीस आणि आपत्ती नियंत्रण कक्षातील कर्मचारी तैनात करीत जनजागृती केली आहे. आळंदी सिध्दबेटात देखील महापुराची पाणी साचले असून सिध्दबेटात मागील बाजूस जाण्यास मर्यादा आल्या आहेत. रहदारीला नदी किनारे रस्ते धोकादायक असल्याने रहदारीला पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगितले आहे.
श्रीक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. आळंदी व दीघी पोलीस स्टेशन व आळंदी नगरपरिषद यांनी दोन पूल वाहतुकी साठी बंद ठेवून पोलिसांचा दोन्ही बाजूंनी बंदोबस्त ठेवलेला असून नगरपालिकेचे कर्मचारी सतर्क आहे. आळंदी नगरपरिषद हद्दीत इंद्रायणी नदीची पातळी वाढल्याने पूर परिस्थती निर्माण झाली असून नदी किनारी भागात असलेल्या कुटुंबाचे, मोकार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
आळंदी मंदिराचा पान दरवाजा कंदील रस्ता देखील रहदारीस बंद ठेवण्यात आला आहे. नदी परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले असून आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मछिंद्र शेंडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दक्षता घेण्याचे सूचना नागरिकांना दिल्या आहेत. गोपालपुरातील धर्मशाळेस देखील दक्षता घेण्यास सूचित करण्यात आले आहे. या भागातील इंद्रायणी नदी कडे जाणारे रस्ते रहदारीला बंद करण्यात आले आहे. इंद्रायणी नदी वरील पाणी साठवण बंधारा इंद्रायणी नगरचे बाजूने खचला असून मुरूम भराव वाहून गेला आहे. या भागातून नागरिकांनी प्रवास न करता पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे सूचना देण्यात आले आहेत.