मतदार यादीतील घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेसचा जाहीर निषेध मोर्चा”

पिंपरी चिंचवड : मतदार यादीतील कथित घोटाळे, मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप आणि निवडणूक आयोगावर दबाव टाकून गैरमार्गाने सत्ता मिळवल्याच्या आरोपांवरून भाजप सरकारविरोधात देहूरोड शहर काँग्रेस कमिटीने आज तीव्र आंदोलन केले. बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या भव्य निषेध मोर्चाच्या माध्यमातून भाजपचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार व प्रदेश तसेच जिल्हा काँग्रेसच्या सूचनेनुसार देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उघडकीस आणलेल्या मतदार यादीतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाजवळून झाली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा पुढे स्वामी विवेकानंद चौक, सुभाषचंद्र बोस चौक, बाजारपेठ, भाजी मंडई मार्गे पुढे सरकत थेट किवळे गावकामगार तलाठी कार्यालयावर पोहोचला.
तेथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून मतदार यादीतील घोटाळ्याची चौकशी करून खुलासा करावा, अशी मागणी करणारे निवेदन गावकामगार तलाठी गीतांजली बाळवडकर यांना देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व देहूरोड शहर काँग्रेसचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तु यांनी केले. यावेळी नगरसेवक गोपाळ तंतरपाळे, गफूरभाई शेख, मोहन राऊत, सुरेश मुळे, गोपाळ राव, बबन टोम्पे, अशोक कुसळे, मलिक शेख, रईस शेख, दीपा जंगले, चंद्रशेखर मारीमुत्तु, वेंकटेश मारीमुत्तु, देवेंद्र मारीमुत्तु, येशू भंडारी, कुबेंद्र मारीमुत्तु यांच्यासह शिवसेना (उबाठा)चे रमेश जाधव, संदीप बालघरे, विशाल दांगट, कोकण विभाग भीम शक्तीचे अध्यक्ष उमेश लांगी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास गोरवे, राजू कदम आणि महेश गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि निषेधाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. काँग्रेसने यावेळी सरकारच्या व प्रशासनाच्या भूमिकेवर कठोर सवाल उपस्थित केले.