आपलं घर’ संस्थेला यंदाचा बाल कार्य सन्मान जाहीर
श्री शिवाजी कुल संस्थेचा १०८ वा वर्धापनदिन ; कुलरंग महोत्सवाचे आयोजन

पुणे : ‘मुलांनी मुलांसाठी चालविलेली मुलांची चळवळ’ असे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या भारतातील सर्वात जुन्या स्काऊट-गाईड खुल्या पथकांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाचे १०८ वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने श्री शिवाजी कुल व माजी कुलवीर संघातर्फे शनिवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी महात्मा फुले पेठेतील टिंबर मार्केटजवळील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे कुलरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात बाल कार्य सन्मान ‘आपलं घर’ या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलमुख्य यश गुजराथी यांनी दिली.
शनिवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणा-या कुलरंग महोत्सवात पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ. पराग काळकर हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळ सदस्य व ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर उपस्थित राहणार आहेत.
कार्यकारी कुलमुख्य श्लोक मराठे म्हणाले, यंदाच्या सन २०२५-२६ वर्षाचा पुरस्कार अनाथ मुलांसाठी वारजे व डोणजे येथे कार्यरत ‘आपलं घर’ संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय फळणीकर हे पुरस्कार स्विकारणार आहेत. सन्मानचिन्ह, भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
सहाय्यक कुलमुख्य साक्षी वाडकर म्हणाल्या, पुणे शहर भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्थेचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य मिळते. यावेळी कुलरंग महोत्सवांतर्गत कुलवीरांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम देखील होणार आहेत. महोत्सवाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी व श्री शिवाजी कुलाच्या आजी-माजी कुलवीरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.



