कर्णबधिर आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत सुहृद मंडळ प्रथम
विद्या महामंडळ संस्थेच्या मूक-बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्रातर्फे : कर्णबधिर विद्यार्थ्यांची आंतरशालेय एकांकिका स्पर्धा

पुणे : विद्या महामंडळ संस्थेच्या मूक-बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्रातर्फे कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत हडपसरच्या सुहृद मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांनी मुलगी वाचवा ही एकांकिका सादर केली. घोले रस्त्यावरील पंडीत जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे स्पर्धा संपन्न झाली.
स्पर्धेचे उद्घाटन अश्विनी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अ.ल. देशमुख, विद्या महामंडळ संस्थेचे कार्यवाह लिलाधर गाजरे, मुक बधिर विभागाचे महेंद्र अर्विकर व अश्विनी जोशी ,स्वाती साळवी, सुनीता भांडगे , प्रवीण कदम हे उपस्थित होते. स्पर्धेत ८ संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण प्रख्यात नाट्य व कला क्षेत्रातील मान्यवर, विनिता पिंपळखरे आणि सुधांशु पानसे आणि उषा उंडे यांनी केले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे बक्षिसाचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी जोशी यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ विद्या महामंडळ संस्थेचे अध्यक्ष राम रानडे व रोटरी क्लब ऑफ शिवाजी नगरच्या सदस्या रावेतकर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचे सांघिक प्रथम पारितोषिक हडपसरच्या सुहृद मंडळाला मिळाला मिळाले असून त्यांनी ‘मुलगी वाचवा’ ही एकांकिका सादर केली. अयोध्या चॅरिटेबल ट्रस्टला द्वितीय पारितोषिक मिळाले असून त्यांनी ‘शब्दाविना बंध आनंदाचे’ ही एकांकिका सादर केली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन भांडारकरच्या सुहृद मंडळाचे अर्जुन मोरे यांना मिळाले, सर्वोत्कृष्ट लेखन धायरीच्या सुहृद मंडळच्या मोबाईल चांगले काम करतो या एकांकिकेला मिळाले. सर्वोत्कृष्ट नेपथ्य चिंचवडच्या मूकबधिर विद्यालयाला ‘बुद्धीची चातुर्य कथा’ या एकांकिकेला मिळाले. सर्वोत्कृष्ट संगीत अयोध्या चॅरिटेबल ट्रस्टला तर सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून हडपसरच्या सुहृद मंडळाच्या वैष्णवी म्हस्के हिला ‘सून’ या पात्रासाठी मिळाले.
फोटो ओळ – विद्या महामंडळ संस्थेच्या मूक-बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्रातर्फे कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित संस्थेचे पदाधिकारी व विजेते.



