मराठी

ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात कुंकूमार्चन पूजाविधी आणि विशेष आरास

विजयादशमी निमित्त विशेष आरास आणि महाभोंडल्याचे देखील आयोजन

Spread the love

पुणे: ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात महाभोंडला आणि कुंकूमार्चन पूजाविधी यांचे आयोजन करण्यात आले. छोट्या मुलांपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी उत्साहात फेर धरत भोंडला खेळला. तसेच विजयादशमी निमित्त विशेष आरास करण्यात आली होती.

मंदिराच्या सभामंडपात महाभोंडला आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंदिराच्या माजी प्रमुख विश्वस्त संगीता ठकार, सीमा ठकार, अश्विनी ठकार, आरती ठकार, साक्षी ठकार या महिला पुजारींसह परिसरातील महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. देवीची गाणी आणि भजने गात महिलांनी फेर धरला. या प्रसंगी ग्रामदैवत श्री कसबा गणपती मोरयाची पोषाख पूजा करण्यात आली होती. तसेच गणपतीसमोर करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी देवीची भरजरी साडी आणि अलंकारांनी सजवलेली विशेष पूजा बांधण्यात आली होती. फुलांच्या पाकळ्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.

महाभोंडल्यानंतर मंदिराच्या सभामंडपात कुंकूमार्चन पूजाविधी संपन्न झाला. यावेळी श्रीसूक्त पठण करत देवीला कुंकू अर्पण करण्यात आले. या विधीत सीमा ठकार, साक्षी ठकार, स्वाती ठकार, आरती लोहगावकर, शार्दूल ओक, दीपा तावरे, कामना धर्माधिकारी, मेघा जामदार, सुधा ठकार, सुनीता जगताप, प्रेरणा बेडिगेर या महिला सहभागी झाल्या. वर्षा वडके आणि त्यांच्या सहकारी महिला गटाने श्रीसूक्ताचे पठण केले. नीता उपासनी यांनी ऐगीरी नंदिनी हे देवीचे स्तोत्र सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कसबा गणपतीच्या पुजारी सीमा ठकार यांनी केले.रात्री उशिरा ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरयाची पारंपारिक शेजारती झाली.

*विजयादशमी निमित्त विशेष आरास
घरातील शुभकार्याची पहिली अक्षत आमंत्रण ग्रामदैवत श्री जयती गजानन कसबा गणपती ला करण्याची प्रथा पुण्यात पूर्वापार चालत आली आहे. त्यानुसार दसऱ्याचा शुभ मुहूर्त साधून परंपरेनुसार अनेक गणेशभक्तांनी आपल्या घरातील शुभकार्याचे पहिले आमंत्रण ग्रामदैवत कसबा गणपती ला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विजयादशमी निमित्त विशेष आरास देखील करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!