महामानवाला ‘बसपा’चे अभिवादन !
बाबासाहेबांचे 'मिशन' पूर्ण करण्यासाठी बहुजनांनी एकत्र यावे महापरिनिर्वाण दिनी बसप महासचिव डॉ. हुलगेश चलवादींचे आवाहन

६ डिसेंबर २०२५, पुणे: विश्वरत्न, महामानव, असंख्य कुळाचे उद्धारकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन, कलेक्टर कचेरी समोरील त्यांच्या पुतळ्याला बहुजन समाज पक्षाच्या वतीने पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांचे मिशन पूर्ण करण्यासाठी बसपा कार्यरत असून शोषितांना शासनकर्ते बनवण्यासाठी वचनबद्ध आहे, अशी भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
देशाचे ऐक्य अबाधित राखण्यासाठी, लोकशाही मूल्ये आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी, बहुजन विचारधारेच्या सर्व संघटना, राजकीय पक्ष, विचारवंत आणि नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन यनिमित्त पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोनचे मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी केले.
बाबासाहेबांनी तळागाळातील समाजाला विकासाच्या मुख्याधारेत आणण्यासाठी ‘बहुजन हिताय,बहुजन सुखाय’ असे संविधान देशाला दिले. परंतु, सध्या संविधानविरोधी आणि आंबेडकरी विचारांना विरोध करणाऱ्या शक्तींचा वावर वाढत आहे. या शक्तींमुळे लोकशाही आणि सामाजिक न्यायाची मूल्ये धोक्यात येत आहेत.
विचारधारेच्या लढ्यातून त्यांना योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी आणि बाबासाहेबांचे समानता, बंधुता व जातीयव्यवस्थेविरोधातील विचारांना अधिक बळ देण्यासाठी बहुजन विचारांच्या संघटनांनी एकत्र येणे आज काळाची गरज आहे, अशी भावना डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.
यावेळी बसपचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हाप्रभारी परशुराम अरुणे, शफी शेख, विजय बेदे, जिल्हा महासचिव प्रवीण वाकोडे, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष किशोर अडागळे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



