सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनकडून वैभवशाली दुर्गापूजा महोत्सवास प्रारंभ

पुणे : बंगाली शैलीतील खास सजावट, कर्णमधुर असे रबिंद्र संगीत, फुलांची सजावट, बंगाली धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…अशा आनंदमय वातावरणात सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे शारदीय दुर्गा पूजा 2025 महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. पुण्यातील साफा बँक्वेटस, बालेवाडी हायस्ट्रीट येथे 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरु असणाऱ्या या महोत्सवात ,पारंपरिक पद्धतीने होणारी दुर्गा पूजा, महाआरती, विविध रंगी भक्ती संगीत व नृत्य, कलाकारांचा नयन मनोहर अविष्कार तसेच भारतातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तांसाठी रोज भोग व प्रसाद,सिंदूर खेला, विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी प्रदर्शन आणि पारंपरिक बंगाली फूड फेस्टिवलचा समावेश आहे. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता पूजेला प्रारंभ होईल. दुपारी 3 वाजता सिंदूर खेला व त्यानंतर प्रतिमा निर्जन पार पडतील.

याप्रसंगी पारंपरिक बंगाली वेशभूषा करून भक्तांनी दुर्गादेवीसमोर केले जाणारे धूनुची हे भक्तिमय नृत्य सादर केले. यावेळी सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय बिस्वास, सरचिटणीस स्नेहा कुंडू व सौमित्र कुंडू, विश्वस्त राज व श्रेया भनोट, उपाध्यक्ष जॉयदीप चॅटर्जी यांनी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी वनराई संस्थेच्या सहकार्याने वृक्षारोपण देखील करण्यात आले.
या वर्षाची महोत्सवाची संकल्पना – “वारसा आणि सामंजस्याची सांगड” (हेरिटेज मीटस हार्मनी) ही आहे.इको फ्रेंडली दुर्गा मातेची भव्य मूर्ती हे या उत्सवाचे खास आकर्षण आहे. या महोत्सवात बंगाली संस्कृतीतील प्राचीन परंपरांचा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा संगम पहावयास मिळणार असून त्यातून सामाजिक ऐक्य व देशाभिमान यांचे आगळे दर्शन घडणार आहे.
सप्तपदी असोसिएशनच्या पर्यावरण जागरुकतेशी साधर्म्य सांगणारे अनेक विध सामाजिक कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात येणार आहे. संपूर्ण वातानुकूलित संकुल, व्हॅले पार्किंग, ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी व्हील चेअर सुविधा, 24 तास वैद्यकीय सहाय्यक यांची उपस्थिती यातून सप्तपदी असोसिएशनने हा दुर्गा पूजा महोत्सव सर्व सहभागी भाविकांसाठी कोणत्याही अडथळ्याविना व आनंददायक रित्या पार पाडेल अशी काळजी घेतली आहे. दररोज सकाळी विधीवत दुर्गा पुजा होणार असून त्यापाठोपाठ पुष्पांजली अन्य पारंपरिक पुजा विधी यांचा समावेश असणार आहे.



