आळंदीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जन्मोत्सवा निमित्त लेखन स्पर्धा
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त डोंबिवलीतील ज्ञानसेवा प्रतिष्ठानने माउलींच्या जीवन चरित्र व कार्य यावर आधारित विध्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन उत्साहात केले. या स्पर्धा इयत्ता तिसरी ते आठवी पर्यंतच्या शालेय मुलांसह इयत्ता अकरावी पासून पुढे महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी लेखी स्वरूपात घेण्यात आली होती. या स्पर्धेत आळंदी तील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
ओळख ज्ञानेश्वरीची या पुस्तकाचे लेखक ह.भ.प. सुभाष महाराज गेठे, ह.भ.प. संतोष महाराज सांगळे, ह.भ.प. ज्ञानेश्वर खैरनार महाराज, ज्ञानसेवा प्रतिष्ठान अध्यक्षा अपर्णा परांजपे या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ह.भ.प. सुभाष महाराज गेठे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत स्वरुपाच्या कार्याची आवश्यकता असल्याचे विषद केले. त्यांनी सहभागी मुलांना शुभेच्छा देऊन स्पर्धेला सुरुवात झाली. ज्ञानसेवा प्रतिष्ठानने विविध भागातून या स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना माउलींचे थोडक्यात चरित्र व निवडक प्रसंग यांवर आधारित माहिती छापील स्वरूपात उपलब्ध करून दिली होती. या वर आधारित प्रश्नपत्रिका देत जेणे करून विद्यार्थ्यांना माउलींच्या चरित्रतून प्रेरणा मिळावी. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले चमत्कार हे केवळ अलौकिक प्रदर्शन नसून समाजात अज्ञानातून निर्माण झालेल्या अनेक चुकीच्या रूढी दूर करुन शुद्ध अध्यात्म ज्ञान व भक्ती रूढ केल्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला जावा हे मुख्य प्रयोजन ही स्पर्धा घेण्यामागे होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आळंदीतील श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे विद्यालय यांनी विशेष सहकार्य केले. आळंदीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पण आपला अमूल्य सहभाग नोंदवून सहकार्य केल्याचे प्रतिष्ठान च्या पुणे विभाग प्रमुख योगिनीताई सराफ यांनी सांगितले. विजेत्या मुलांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.



