आळंदी (प्रतिनिधी): हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने ‘पत्रकार दिना’चे औचित्य साधून तीर्थक्षेत्र अलंकापुरीत विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात माऊलींच्या पादुकांचे पूजन आणि सिद्धबेटावर वृक्ष संवर्धनाचा संकल्प करून पत्रकार बांधवांनी हा दिवस साजरा केला.
माऊलींच्या चरणी वेदमंत्रांचा जयघोष
मंगलमय वातावरणात सकाळी ठीक ७ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात माऊलींच्या चल पादुकांची पूजा करण्यात आली. वेदमूर्ती प्रफुल्ल प्रसादे यांच्या पौरोहित्याखाली वेदघोषाच्या स्वरात हा विधी संपन्न झाला. यावेळी श्रींचे दर्शन घेऊन श्री गणेश मंदिर मंडप येथे आरती करण्यात आली. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ अध्यक्ष अर्जुन मेदनकर, जिल्हा प्रतिनिधी अमर गायकवाड यांनी उपक्रमाचे संयोजन केले. या वेळी पत्रकारांनी समाजहिता साठी आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेसाठी माऊलींकडे आशीर्वाद मागितले.
सिद्धबेटावर वृक्ष संवर्धनाचा जागर
मंदिरातील पूजेनंतर सकाळी ८ वाजता सर्व पत्रकार बांधवांनी श्री संत लीला भूमी सिद्धबेट येथे भेट दिली. या ठिकाणी पवित्र अजानवृक्षाची पूजा करण्यात आली. सिद्धबेटाची पाहणी करतानाच निसर्ग संवर्धन आणि वृक्ष संगोपना बाबत उपस्थित मान्यवरांमध्ये सविस्तर चर्चा झाली. पत्रकारिता करतानाच सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पर्यावरण रक्षणासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी अर्जुन मेदनकर यांनी व्यक्त केला. गेल्या चार वर्षा पासून सिद्धबेट येथे वृक्षारोपण, संवर्धन, पर्यावरण रक्षणाचे कार्य सुरू असून येथील हरित संपदा संवर्धन होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांचे स्वागत आणि शुभेच्छा
या प्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना आणि मान्यवरांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. अलंकापुरीतील कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व मान्यवर आणि पत्रकार संघ पुढील नियोजित मुंबई दौऱ्यासाठी रवाना झाला.
या उपक्रमा मुळे पत्रकारिते सोबतच अध्यात्म आणि पर्यावरण रक्षणाचा एक सुंदर संगम आळंदीत पाहायला मिळाला.



