देश / विदेशब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

Bajaj Pune Grand Tour 2026: बजाज पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा

'प्रोलॉग रेस' पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न

Spread the love

▪️ मलेशियाच्या तेरेंगानू संघाचा फर्गस ब्राउनिंग प्रोलेॉगमध्ये अव्वल; आशियाई पदक विजेता हर्षवीर सिंगचा प्रभावी भारतीय ठसा

Bajaj Pune Grand Tour 2026:

पुणे, दि. 19 : (जिमाका) बजाज पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेअंतर्गत आयोजित नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक ते जंगली महाराज रोडवरील केएफसी दरम्यान ७.५ किलोमीटरची ‘प्रोलॉग रेस’ यशस्वीपणे पार पडली, या रेसचा पारितोषिक वितरण समारंभ नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला; या समारंभास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भारतामधील पहिलीच UCI 2.2 श्रेणीतील बहुदिवसीय पुरुष रोड सायकलिंग स्पर्धा असलेल्या बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ला सोमवारी दुपारी उत्साहात सुरुवात झाली. डेक्कन जिमखाना येथील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे प्रोलेॉग टप्प्याने या ऐतिहासिक स्पर्धेचा श्रीगणेशा झाला.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक विजेत्या खेळाडूंना वितरण करण्यात आले.

‘प्रोलॉग रेस’ स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे: पाच दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा सूर निश्चित करणाऱ्या प्रोलेॉगमध्ये दुपारी ठीक १.३० वाजता भारतीय राष्ट्रीय विकास संघाचा सचिन देसाई पहिला सायकलपटू म्हणून रस्त्यावर उतरला. प्रारंभस्थळी उपस्थित प्रेक्षकांनी ‘सचिन, सचिन’च्या घोषणांनी त्याचे जोरदार स्वागत केले.
मात्र दिवसअखेर बाजी मारली ती मलेशियाच्या तेरेंगानू सायकलिंग टीमकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन सायकलपटू फर्गस ब्राउनिंग याने. अवघ्या ०८:०५.८९ मिनिटांत ७.५ किमी अंतर पूर्ण करत त्याने प्रोलेॉगमध्ये सर्वांत जलद वेळ नोंदवली. ताशी ५० किमीहून अधिक वेग राखत ब्राउनिंगने यलो जर्सी मिळवली असून मंगळवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यासाठी तो आघाडीच्या स्थानावरून सुरुवात करणार आहे.

प्रोलेॉग जिंकल्यानंतर ब्राउनिंग म्हणाला, “मी सुरुवातीपासूनच जोर लावला होता. शेवटच्या उतारावर फक्त वेग टिकवून ठेवण्यावर भर होता. भारतात पहिल्यांदाच अशी स्पर्धा होत आहे. आयोजकांनी अप्रतिम तयारी केली आहे. रस्ते उत्कृष्ट होते आणि सुरक्षा व्यवस्थाही चोख होती. पुढील डोंगराळ टप्प्यांची मला विशेष उत्सुकता आहे.”
अत्यंत चुरशीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचाच डिलन हॉपकिन्स (रुजाई इन्शुरन्स विनस्पेस, थायलंड) ०८:०६.३३ वेळेसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर एस्टोनियाचा आंद्रियास मिल्टियाडिस (क्विक प्रो टीम) तिसऱ्या क्रमांकावर (०८:०८.९२) आला. बेल्जियमचा यॉर्बन लॉरिसन (टार्टेलेटो-इसोरेक्स) चौथ्या, तर तेरेंगानू संघाचाच झेब किफिन पाचव्या स्थानावर राहिला. या पाचही सायकलपटूंना स्टेज १ साठी सुरुवातीच्या आघाडीच्या पोझिशन्स मिळाल्या आहेत.
भारतीय सायकलपटूंची आश्वासक कामगिरी: भारतीय संघाकडून हर्षवीर सिंग सेखों (भारतीय राष्ट्रीय संघ) याने ०८:४२.०७ वेळेसह प्रोलेॉगमध्ये सर्वोत्कृष्ट भारतीय व तिसरा सर्वोत्कृष्ट आशियाई सायकलपटू म्हणून नोंद केली. त्यामुळे त्याला स्टेज १ साठी २६वे प्रारंभस्थान मिळाले.
त्याच्यानंतर विश्वजीत सिंग (०८:४७.३३) आणि नवीन जॉन (०८:४९.४४) यांनी अनुक्रमे ३५वे व ४३वे स्थान मिळवत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत भारताची भक्कम उपस्थिती अधोरेखित केली. जागतिक दर्जाच्या सायकलपटूंविरुद्ध घरच्या रस्त्यांवर मिळालेला हा अनुभव भारतीय सायकलिंगसाठी मोलाचा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!