स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ४० वे कवी संमेलन व यशवंतराव चव्हाण कला साहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
अभिनेते महेश कोठारे यांना 'यशवंतराव चव्हाण कला जीवनगौरव पुरस्कार', तर रानमाणूस प्रसाद गावडे यांना 'अजितदादा सामाजिक कार्य पुरस्कार'

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नाट्यअभिनेते सतीश आळेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण; संजय ढेरे यांची पत्रकार परिषदेत माहिती
पुणे: महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या वतीने कवी संमेलन व यशवंतराव चव्हाण कला साहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळ्याचे यंदा ४० वे वर्ष आहे. यंदा हा सोहळा येत्या गुरुवारी (ता. १२) रात्री ८.३० वाजता टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते, ज्येष्ठ नाट्यअभिनेते सतीश आळेकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती संयोजक प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टचे संजय ढेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ट्रस्टचे गौरव फुटाणे, कुणाल जाधव, कवी भरत दौंडकर, कवयित्री अंजली कुलकर्णी, सुनील महाजन आदी उपस्थित होते.
संजय ढेरे म्हणाले, ” गेल्या ४० वर्षांपासून दरवर्षी १२ मार्चला या सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाचा प्रकाश ढेरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ सिनेअभिनेते महेश कोठारे यांना जाहीर झाला आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रथमच दिला जाणारा ‘अजितदादा सामाजिक कार्य पुरस्कार’ यंदा सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रानमाणूस प्रसाद गावडे यांना जाहीर झाला आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या दोन पुरस्कारासह ‘यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार’ बुलढाणा येथील प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी (काव्यसंग्रह-विस्मरणाच्या आरण्यात), चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर (दंडकारूण्य) व नाशिक येथील प्रतिभा पवार-खैरनार (कवितासंग्रह – वंशावळीच्या प्राचीन सरीतून) यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रोख ११,००१ व सन्मानचिन्ह असे आहे.”
अंजली कुलकर्णी म्हणाल्या, “यावेळी होणाऱ्या कवी संमेलनात राज्यभरातील नामवंत कवी सहभागी होणार आहेत. अशोक नायगावकर (मुंबई), महेश केळुसकर (फोंडा), वैशाली पतंगे (कुंभारगाव), प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी (बुलढाणा), अविनाश पोइनकर (चंद्रपूर), यामिनी दळवी (मुंबई), प्रतिभा खैरनार (नाशिक), प्रशांत मोरे (कल्याण), कल्पना दुधाळ (बोरी भडक), मधुरा उमरीकर (परभणी), अविनाश कोठावडे (संभाजीनगर), अरुण पवार (परळी वैजनाथ), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी), अंजली कुलकर्णी (पुणे), अनिल दीक्षित (पिंपरी चिंचवड), शशिकांत तिरोडकर (कोकण), गुंजन पाटील (सोयगाव) यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे करणार आहेत.”
प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांचा हा उपक्रम महाराष्ट्रातील साहित्य व कला क्षेत्रातील मानबिंदू ठरला आहे. ४०व्या वर्षात पदार्पण करताना हा सोहळा अधिक भव्य व संस्मरणीय करण्याचा ट्रस्टचा संकल्प आहे, असे गौरव फुटाणे यांनी नमूद केले.

