ब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्र

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे राज्यस्तरीय विचारप्रधान अभियान व लोकशाही संवाद

Spread the love
शिवराज मोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती; एक मे रोजी होणार उद्घाटन

पुणे: समाजातील सध्याच्या वैचारिक, सामाजिक आणि शैक्षणिक आव्हानांना उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभरात पाच विचारप्रधान अभियानाची सुरुवात करण्यात येणार असून, लोकशाही संवाद व्यासपीठाची स्थापना केली जाणार आहे. युवकांना जागरूक, संघटित व सक्रिय करून समाजात परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने हे अभियान महत्वाचे ठरणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, प्रदेश सरचिटणीस भूषण रणभरे, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ नवले, प्रदेश सचिव अभिषेक अवचार, प्रियंका चौधरी आदी उपस्थित होते.

शिवराज मोरे म्हणाले, “या उपक्रमांतर्गत डॉ. नरेंद्र दाभोलकर अभियान (वैज्ञानिक दृष्टिकोन), गोविंद पानसरे अभियान (सामाजिक न्याय), एम. एम. कलबुर्गी अभियान (विचार स्वातंत्र्य), रोहित वेमुला अभियान (विद्यार्थी समानता), गौरी लंकेश अभियान (सत्य व पत्रकारिता) असे पाच स्वतंत्र अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहेत. डॉ. दाभोलकर अभियानाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार केला जाईल. गोविंद पानसरे अभियानांतर्गत संविधानिक मूल्ये, समता आणि सामाजिक ऐक्य यावर भर दिला जाईल. एम. एम. कलबुर्गी अभियानाद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचारमुक्त संवादाला प्रोत्साहन दिले जाईल. रोहित वेमुला अभियान विद्यार्थ्यांमधील भेदभावविरोधी जागरूकता, समान संधी आणि मानसिक आरोग्य सहाय्य यावर लक्ष केंद्रित करेल, तर गौरी लंकेश अभियानाच्या माध्यमातून फेक न्यूजविरोधी जनजागृती, मीडिया साक्षरता आणि निर्भय पत्रकारितेला समर्थन दिले जाईल. सर्व शाळा, महाविद्यालये, ग्रामीण व शहरी भागात जनजागृती, संवाद, प्रशिक्षण आणि कृतीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने ही अभियाने राबविण्यात येणार आहेत.”

यासोबतच, या सर्व अभियानांना एकत्र जोडण्यासाठी आणि समाजातील विविध स्तरांपर्यंत संवाद पोहोचवण्यासाठी १ मे, महाराष्ट्र दिनानिमित्त ‘लोकशाही संवाद -डेमोक्रॅटीक डायलॉग’ हा प्रमुख कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. विविध क्षेत्रातील विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे. या संवादाच्या माध्यमातून पाचही अभियानांतील मूल्यांना एकत्रित व्यासपीठ मिळणार असून, समाजातील विविध घटकांमध्ये विचारांची देवाणघेवाण, जागरूकता आणि संघटनात्मक बळकटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे शिवराज मोरे यांनी नमूद केले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने युवकांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले असून, संविधानिक मूल्यांवर आधारित, विचारशील, समतामूलक आणि जागरूक समाज निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली आहे. ‘युवक विचार करेल, तेव्हाच भारत बदलेल’ हा नारा घेऊन आम्ही येत्या काळात काम करणार आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!