
पुणे : वर्षा ऋतुनिमित्त प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन आयोजित ‘बरखा रंग’ या अनोख्या मैफलीत रसिकांनी विदुषी सानिया पाटणकर, पंडित प्रवीण गावकर यांच्या सुश्राव्य गायनाची तर पंडित मुकुंदराज देव यांच्या बहारदार तबला वादनाची अनुभूती घेत स्वरवर्षाविष्कार अनुभवला.
टिळक रोडवरील गणेश सभागृहात ‘बरखा रंग’ या आयोजन करण्यात आले आहे. ‘बरखा रंग’ मैफलीची सुरुवात गोवा येथील सुप्रसिद्ध गायक पंडित प्रवीण गावकर यांनी राग मधुवंतीमधील ‘आयी बरखा’ या पारंपरिक बंदिशीने केली. त्याला जोडून द्रुत लयीतील ‘मोरे कर्तार नैय्या करो मोरी पार’ ही बंदिश सादर केली. खुला आवाज, सुमधुर सादरीकरण रसिकांना विशेष भावले.
यानंतर पंडित मुकुंदराज देव यांचे बहारदार तबला वादन झाले. त्यांनी तीन तालातील विविध छटा रसिकांसमोर सादर केल्या. ठेका पेशकार, ‘धीन्’चा विस्तार, बनारस घराण्याचे चलन, लखनवी अदब दर्शविणारा रेला तसेच कथक नृत्याला तबला साथ करताना तबल्यातून सादर केलेले होरीचे कवित्त, छंद, परण यांना रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद देत तबला वादनाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाची सांगता विदुषी सानिया पाटणकर यांच्या समधुर, सुश्राव्य गायनाने झाली. बरखा ऋतुनिमित्त आयोजित विशेष मैफलीत त्यांनी साडेसात मात्रांची गिनती दर्शवित राग भूपेश्र्वरी मधील गुरू अश्र्विनी भिडे-देशपांडे यांनी रचलेली ‘कारी बदरिया घेरी, पिया नही पास’ ही बंदिश तयारीने सादर केली. त्यानंतर द्रुत लयीत ‘प्रितमबिन लागत नाही जिया’ ही बंदिश सादर केली. पाटणकर यांनी कार्यक्रमाची सांगता गंगाधर महांबरे रचित ‘बिजलीचा टाळ, नभाचा मृदुंग‘ या भावपूर्ण अभंगाने केली. घुमावदार आवाज, सुरेल ताना, उत्तम दमसास आणि सुमधुर सादरीकरण रसिकांना विशेष भावले.
कलाकारांना मालू गावकर, देवेंद्र देशपांडे (संवादिनी), प्रशांत पांडव (तबला), वासिम खान (सारंगी), स्मीता पुरंदरे, मनिषा पिंपळगावकर, रुची शिरसे, आदिती नगरकर, मधुरा पेठे (सहगायन, तानपुरा) यांनी साथसंगत केली.
प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे विश्र्वस्त नितीन महाबळेश्वरकर यांच्या मातोश्री विजया महाबळेश्र्वरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मातोश्री पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा मातोश्री पुरस्कार सुप्रसिद्ध युवा गायक विराज जोशी यांच्या मातोश्री शिल्पा श्रीनिवास जोशी यांना प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनच्या विश्र्वस्त डॉ. सुचित्रा कुलकर्णी आणि नितीन महाबळेश्र्वरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रूपये अकरा हजार रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सत्काराला उत्तर देताना शिल्पा जोशी म्हणाल्या, आजची युवा पिढी शास्त्रीय संगीताकडे आकृष्ट व्हावी आणि भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत टिकून राहावे यासाठी प्रयत्न केले जावेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.