ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर
आयुर्वेद ही अचूक रोगनिदानाची शास्त्रशुद्ध विचारपद्धती : डॉ. हरिश पाटणकर
लंडनमधील ‘एपीए आयुर्फेस्ट २०२६’मध्ये बीजभाषण

पुणे : आयुर्वेदातील रोगनिदान ही केवळ लक्षणांवर आधारित प्रक्रिया नसून, शरीर, मन आणि प्रकृतीचा सखोल अभ्यास करणारी शास्त्रशुद्ध विचारपद्धती आहे. दोष, धातू आणि मल या मूलतत्त्वांच्या आधारे कोणत्याही रोगाचे अचूक निदान करता येते. रोगाचे निदान, त्याचे समूळ नष्ट करण्याची क्षमता आयुर्वेदामध्ये असून, आयुर्वेदाला अधिक प्रभावी करण्यासाठी संशोधन व तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी,” असे प्रतिपादन पुण्यातील प्रख्यात आयुर्वेदतज्ज्ञ, संशोधक आणि भारतीय ज्ञानपरंपरेचे अभ्यासक डॉ. हरिश पाटणकर यांनी केले.
लंडन येथील आयुर्वेद प्रोफेशनल्स असोसिएशनच्या वतीने ‘एपीए आयुर्फेस्ट २०२६’, या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. पाटणकर यांचे ‘भारतीय आयुर्वेदाची मूलभूत तत्वे’ यावर बीजभाषण झाले. या परिषदेत जगभरातील सुमारे दोनशेहून अधिक नामवंत आयुर्वेदतज्ज्ञ, संशोधक आणि व्यावसायिकांची उपस्थिती होती. डॉ. विजय मूर्ती, लोथार पिर्क, डॉ. करेन ओ’ब्रायन-कोप, डॉ. मनीष पंडित, डॉ. सुनिल कुमार, डॉ. रूपी औजला, डॉ. विनायक अबॉट, डॉ. कांचन शर्मा, डॉ. ख्रिस्तोफर एथरिज, डॉ. स्नेहल पाटणकर यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. पाटणकर यांनी आपल्या भाषणात आयुर्वेदातील दोष, धातू आणि मल या मूलभूत तत्त्वांच्या आधारे रोगनिदान करण्याच्या व्यापक विचारपद्धतीचे विवेचन केले. आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून शरीर, मन आणि प्रकृतीचा एकत्रित विचार करणारे संपूर्ण जीवनशास्त्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारंपरिक ज्ञानाची आधुनिक संदर्भात केलेली मांडणी, चिकित्सक दृष्टिकोन आणि संशोधनाधारित विचार यामुळे उपस्थित विदेशी व्यावसायिक विशेष प्रभावित झाले. भारतीय आयुर्वेदाची सखोलता आणि जागतिक आरोग्य व्यवस्थेमधील त्याचे महत्त्व या व्याख्यानातून प्रभावीपणे अधोरेखित झाले.
डॉ. पाटणकर हे ‘केशायुर्वेद’ या भारतातील पहिल्या आर्युवेदिक हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक आहेत. आयुर्वेद संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवणारे संशोधक म्हणून त्यांची ओळख आहे. ‘केशायुर्वेद’ला २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बेस्ट आयुष स्टार्टअप’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच डॉ. पाटणकर प्राचीन संहिता गुरुकुल संस्थेमार्फत आयुर्वेद शिक्षण, भारतीय ज्ञानपरंपरा आणि संस्कृताधारित वैद्यकीय वारसा जतन करण्यासाठी कार्यरत आहेत. देश-विदेशातील विद्यार्थ्यांना भारतीय आयुर्वेदाची शास्त्रीय मांडणी समजावून सांगण्याचे कार्य त्यांच्या संस्थेमार्फत केले जात आहे.


