धर्मब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्र

ज्येष्ठ वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2026’ प्रदान

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचा उपक्रम; महापौर मंजूषा नागपुरे यांच्याहस्ते वारकऱ्यांचा सन्मान

Spread the love

30 फूट विठ्ठल मूर्तीने वेधले लक्ष

पुणे  : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दाखल झालेल्या वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ सेवेकरी, भजन-कीर्तन, संगीत, सामाजिक आणि संतसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वारकऱ्यांचा ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार २०२६’ देऊन सन्मान करण्यात आला. विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात पुण्याच्या महापौर मंजूषाताई नागपुरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यंदाच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून सौ.सुलभा विजयकुमार दिवाण (भजनी गायिका), ह.भ.प. पांडुरंग दत्तात्रय गुजाका (भजनी गायक), ह.भ.प. हर्षल एकनाथ जाधव (मृदुंगमनी, संगीत विशारद), श्रीमती कांता साहेबराव लांडगे (भजनी गायिका), गणेश केशव गायकवाड (दत्त सेवक), श्रीमती शांताबाई पाटलोजी ढोरे (भजनी गायिका) आणि ह.भ.प. बाबासाहेब दत्तात्रय रानवडे (भजनी मंडळ) यांचा सन्मान करण्यात आला.

बोपोडी मेट्रो स्टेशनजवळील पालखी विसावा स्थळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला पुण्यनगरीचे महापौर मंजूषाताई नागपुरे, तसेच उपमहापौर तथा समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक सनी निम्हण, माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर, नगरसेविका भक्तीताई गायकवाड, नगरसेविका सपनाताई छाजेड,आनंद छाजेड,रिपाइं शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, रोटरी क्लब ऑफ पुना डाउनटाउन आणि संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी मोफत मालिश व फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून देण्यात आली. शेकडो वारकऱ्यांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

 

कार्यक्रमादरम्यान स्थानिक भजनी मंडळांनी अभंग,भजन आणि कीर्तन सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन ॲड.ज्ञानेश्वर जाविर यांनी केले.समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या 30 फुटी विठ्ठल मूर्ती आणि संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती असलेल्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

(उपमहापौर पुणे महानगरपालिका)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!