ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार सुरू; सुप्रिया सुळे

Spread the love

मुंबई, दि.५ (शशिकांत पाटोळे) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बुधवारी (४ नोव्हेंबर) संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली.

शरद पवार यांना गेल्या काही दिवसांपासून खोकला आणि छातीत वेदना होत होत्या. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवस उपचार आणि वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

पुढील तपासण्यांसाठी मुंबईत दाखल

पुण्यातून मुंबईला परतल्यानंतर शरद पवार यांना पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बुधवारी सकाळी शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांनी शरद पवार यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात असून ते लवकर बरे व्हावेत, अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!