
पुणे. भारतातील दिव्यांग मुलांना त्यांच्या गरजांनुसार सुसज्ज असलेली खेळांची मैदाने आणि प्रशिक्षण सुविधा मिळण्यात आजही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. खेळांप्रती त्यांची आवड आणि जिद्द ही तीव्र असली, तरी आवश्यक सुविधा, प्रशिक्षकांची उपलब्धता आणि सर्वसमावेशक वातावरणाच्या अभावामुळे त्यांना आपली क्षमता पूर्णपणे सिद्ध करता आलेली नाही.
2024 मधील पॅरिस गेम्समध्ये विक्रमी 29 पदकांसह एकूण 60 पदके जिंकून भारताच्या पॅरालिम्पिक कामगिरीत नक्कीच सुधारणा झाली आहे. तरीही अनेक प्रतिभावान खेळाडूंना योग्य संधी मिळणे बाकी आहे. अशा खेळाडूंच्या पुढील पिढीला घडवण्यासाठी आणि त्यांना योग्य संधी मिळवून देण्यासाठी स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधा मजबूत करण्याची गरज आता अधिक तीव्र झाली आहे.
पुण्यातील दिव्यांग सहाय्यता केंद्र ही संस्था अशा मुलांसाठी एक मोठा आधार आहे. 1956 पासून हे केंद्र महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटकमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुनर्वसन, शिक्षण आणि व्यवसायपूर्व प्रशिक्षण देत आहे. मात्र या मुलांच्या सर्वांगीण विकासात खेळ मोठ्या प्रमाणावर समाविष्ट नव्हते. कारण या केंद्रात त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या.
ही गरज लक्षात घेऊन, टाटा ब्लूस्कोप स्टीलने दिव्यांग सहाय्यता केंद्रात अत्याधुनिक बहुउद्देशीय क्रीडासुविधा उभारण्यासाठी मदत केली. यामुळे या मुलांना प्रशिक्षण, स्पर्धा आणि उत्तुंग कामगिरीसाठी आवश्यक साधने उपलब्ध झाली आहेत. या नव्या फुटबॉल मैदानाच्या माध्यमातून कंपनीने आपली सर्वसमावेशकतेची बांधिलकी पुन्हा एकदा दर्शवली असून, या मुलांसाठी खेळ हे यशाकडे नेणारे साधन ठरावे, याची खात्री या निमित्ताने करण्यात आली आहे.
भावी पॅरालिम्पिकपटूंसाठी तयार होत असलेले मैदान
ही बहुउद्देशीय क्रीडासुविधा दिव्यांग मुलांमध्ये असलेल्या क्रीडाप्रतिभेला चालना देण्याचा एक ठोस प्रयत्न आहे. व्यावसायिक खेळाचे दरवाजे उघडण्यासाठी आणि भारताची भविष्यातील पॅरालिम्पिक स्पर्धांमधील कामगिरी उंचावण्यासाठी या सुविधेचा मोठा उपयोग होणार आहे. अनेक दिव्यांग मुलांमध्ये अफाट कौशल्य असते, पण त्यांना स्पर्धात्मक पातळीपर्यंत नेण्यासाठी आवश्यक असलेले संरचित प्रशिक्षण आणि सुविधा मात्र मिळत नाहीत.
या नव्याने उद्घाटन करण्यात आलेल्या फुटबॉल मैदानाच्या माध्यमातून या मुलांना खालील सुविधा उपलब्ध झाल्या आहेत –
• समर्पित प्रशिक्षण वातावरण – मोकळ्या जागा किंवा तात्पुरत्या मैदानी सुविधांपेक्षा निराळ्या असलेल्या या विशेष क्रीडामैदानाच्या माध्यमातून मुलांना सुरक्षित, उत्तम स्थितीत राखलेली जागा उपलब्ध होते, जिथे ते कोणत्याही मर्यादेशिवाय सराव करू शकतात.
• व्यावसायिक मार्गदर्शन आणि कौशल्यविकास – पीटी शिक्षक, फिजिओथेरपिस्ट आणि प्रशिक्षित मार्गदर्शक यांच्या देखरेखीखाली मुलांना संरचित प्रशिक्षण दिले जाते, जे त्यांना स्पर्धात्मक क्रीडाजगतात आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करण्यास मदत करते.
• राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी – या संस्थेचा दूरदृष्टीपूर्ण हेतू म्हणजे दिव्यांग खेळाडूंना व्यावसायिक स्तरावर स्पर्धेत उतरवणे, आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून पॅरालिम्पिक्ससाठी खेळाडू घडवणे.
• अॅडॅप्टिव्ह खेळांसाठी भक्कम पाया – फुटबॉलसोबतच या मैदानात क्रिकेट, खो-खो, कबड्डी, रस्सीखेच अशा अनेक खेळांसाठी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मुले विविध खेळांचा अनुभव घेऊ शकतात आणि नंतर त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करू शकतात.
• सर्वसमावेशक रचना – काँक्रीट रॅम्प आणि व्हीलचेअरसाठी अनुकूल प्रवेशद्वारे यामुळे सर्व खेळाडू विनाअडथळा या ठिकाणी फिरू शकतात.
• खेळासाठी अत्याधुनिक पृष्ठभाग – काँक्रिट बेसवर तयार करण्यात आलेल्या या मैदानात कृत्रिम गवत आणि सस्पेन्शन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे सांध्यांवरील ताण कमी होतो आणि खेळाचा अनुभव अधिक सहज व सुलभ होतो.
• सर्व ऋतूंमध्ये खेळण्यायोग्य – पारंपरिक मैदानांप्रमाणे चिखलामुळे सरावात अडथळे येत नाहीत, त्यामुळे वर्षभर सातत्याने प्रशिक्षण घेणे शक्य होते.
• एकाच मैदानावर अनेक खेळांची सोय – 15 मीटर बाय 30 मीटर आकाराच्या या मैदानामध्ये 6 मीटर उंचीची सेफ्टी नेट्स लावण्यात आली असून, विविध अॅडॅप्टिव्ह खेळांचे आयोजन येथे करता येईल अशी रचना करण्यात आली आहे.
• अधिक सुरक्षिततेची व्यवस्था – मैदानाभोवती लावलेल्या जाळ्यांना आधार देणाऱ्या लोखंडी खांबांवर मऊ स्पंजचे आवरण देण्यात आले आहे. त्यामुळे खेळताना होणाऱ्या संभाव्य दुखापतीचा धोका कमी होतो.
टाटा ब्लूस्कोप स्टीलची व्यापक उद्दिष्टांप्रती बांधिलकी
या उपक्रमाला आपल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमाचा भाग म्हणून पाठिंबा देत, टाटा ब्लूस्कोप स्टीलने सर्वसमावेशक आणि संधी निर्माण करणारी सामाजिक जागा निर्माण करण्याच्या आपल्या व्हिजनला अधिक पाठबळ दिले आहे.
“या मुलांपैकी अनेकांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता आहे. योग्य पायाभूत सुविधा आणि आवश्यक पाठिंबा मिळाला, तर हेच खेळाडू भविष्यात व्यावसायिक खेळाडू बनू शकतात. हा उपक्रम आमच्या ‘#ShelterForAll’ या व्यापक उद्दिष्टालाही बळकटी देतो, ज्यामार्फत देशभरात सुरक्षित आणि विश्वासार्ह छप्पर (रूफिंग सोल्यूशन्स) उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे टाटा ब्लूस्कोप स्टीलच्या डिजीएम – मार्केटिंग आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन, प्रिया राजेश यांनी सांगितले.
सध्या वर्षभरात सुमारे 150 दिव्यांग मुलांना या सुविधेचा लाभ मिळणार असून, ही जागा दीर्घकालीन क्रीडा विकासासाठी एक भक्कम पाया ठरेल. केवळ विरंगुळा म्हणून नव्हे, तर भावी पॅरालिम्पिकपटूंसाठी हे मैदान प्रशिक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल — जिथे कौशल्य असलेल्या खेळाडूंना आपली क्षमता घडवण्याची, व्यावसायिक स्पर्धांमध्ये भाग घेण्याची आणि भारताला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवून देण्याची संधी मिळेल.
वानवडी, पुणे येथील या फुटबॉल मैदानाचे उद्घाटन हा भारतातील सर्वसमावेशक क्रीडा विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यामुळे प्रत्येक मुलाला खेळण्याची, स्वप्ने पाहण्याची आणि यशस्वी होण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी मार्ग तयार झाला आहे.



