ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

आता ३१ ऑक्टोबरपर्यंत सवलतीच्या दरात पाहता येणार शिवसृष्टी

अभय भुतडा फाऊंडेशनतर्फे शिवसृष्टीला ७५ लाखांची देणगी

Spread the love

पुणे, दि. ११ ऑगस्ट, : १५ मे पासून मागील तीन महिन्यात शिवसृष्टीला तब्बल दीड लाखांहून अधिक शिवप्रेमींनी भेट दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही सवलत आणखी वाढवावी या जनभावनेचा आदर करीत पुढील ३१ ऑक्टोबरपर्यंत रुपये ७५ इतक्या नाममात्र दरात नागरिकांना शिवसृष्टी पाहता येणार असल्याची घोषणा आज आयोजित पत्रकार परिषदेत महाराजा शिवछ्त्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त व शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी केली.

पुण्यातील अभय भुतडा फाऊंडेशनच्या वतीने यासाठी ७५ लाखांची देणगी दिल्याची माहितीही यावेळी कदम यांनी दिली. अभय भुतडा फाउंडेशनचे अभय भुतडा, शिवसृष्टी प्रकल्पाचे विश्वस्त अमृत पुरंदरे, सुनील मुतालिक, विनीत कुबेर, प्रकल्पाचे सल्लागार मनोज पोचट, प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यावेळी उपस्थित होते.

याविषयी अधिक माहिती देताना जगदीश कदम म्हणाले “कै. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि महाराजा शिवछ्त्रपती प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीचे दोन टप्पे आता पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरु आहे. या कामाला अनेकांचा हातभार लागत असून शहरातील बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स क्षेत्रातील सुप्रसिद्ध उद्योजक अभय भुतडा यांनी आपल्या अभय भुतडा फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवसृष्टी प्रकल्पाला मागील वेळी ५० लाख रुपयांची देणगी दिली होती. याचा विनियोग करीत १५ मे ते १५ ऑगस्ट या तीन महिन्याच्या कालावधीत शिवसृष्टीला भेट देणाऱ्या प्रत्येकाला सवलतीच्या दरात शिवसृष्टी पाहता आली. या दरम्यान विविध वयोगटातील तब्बल दीड लाखांहून अधिक शिवप्रेमी नागरिकांनी प्रकल्पाला भेट देत शिवकाळ अनुभविला. सदर सवलत आणखी काही दिवस वाढविण्यात यावी, अशी मागणी वेळोवेळी भेट देणाऱ्या शिवप्रेमींकडून होत असताना अभय भुतडा फाऊंडेशनने पुन्हा एकदा रुपये ७५ लाख इतका निधी देत मदतीचा हात पुढे केल्याने आम्ही ही सवलत येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत वाढवीत आहोत. अभय भुतडा यांनी केलेल्या या मदतीचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. या देणगीचा वापर हा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शिवचरित्र पोहोचावे यासाठी व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे, त्यासाठी आम्ही एकमताने ही सवलत वाढविण्याचा निर्णय घेतला.”

त्यानुसार शुक्रवार दि. १५ ऑगस्ट पासून ३१ ऑक्टोबर या मर्यादित कालावधी दरम्यान शिवसृष्टीला भेट देणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीला नाममात्र ७५ रुपये इतके प्रवेशशुल्क आकारण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी शिवसृष्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी, असे आवाहन कदम यांनी केले. याबरोबरच पाच वर्षे वयोगटाखालील पाल्यांना आता शिवसृष्टीत प्रवेश देण्यात येणार नाही, याचीही कृपया शिवप्रेमींनी नोंद घ्यावी.

जास्तीत जास्त शिवप्रेमींना शिवचरित्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास माहिती व्हावा, यासाठी काहीतरी ठोस कृती करण्याची फाऊंडेशनची इच्छा होती. आणि त्यातूनच ही कल्पना पुढे आली आणि प्रतिष्ठानने देखील त्याला अनुमोदन दिले. आता सवलतीच्या दरात जास्तीत जास्त नागरिकांना महाराजांचा इतिहास, त्यांचा संघर्ष, त्यांनी पाहिलेली स्वराज्याची स्वप्ने, त्यांची दूरदृष्टी, त्यांची राज्यपद्धती अनुभविता येईल. यासोबतच त्यांच्या स्वराज्य, स्वभाष व स्वधर्म या विचारांचा प्रचार व प्रसार सर्वत्र होईल असा विश्वास यावेळी अभय भुतडा यांनी व्यक्त केला.

सदर सवलत लागू होण्याआधी शिवसृष्टी पाहण्यासाठी असलेल्या तिकीटाची किंमत ही प्रौढांसाठी प्रत्येकी रु. ६०० तर १६ वर्षांखालील मुलांसाठी प्रत्येकी रु. ३०० इतकी होती. अभय भुतडा यांनी दिलेल्या देणगीमुळे ही तिकीटाची किंमत आता मर्यादित कालावधीसाठी नाममात्र ७५ रुपये असेल.

पुण्याजवळील आंबेगाव, ब्रुद्रुक, पुणे ४११ ०४६ येथे तब्बल २१ एकर परिसरात उभारलेली शिवसृष्टी यानिमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचेल. राज्यातील विविध भागातून आपापल्या कुटुंबातील लहाने मुले व तरुणांना नागरिक शिवसृष्टी दाखविण्यास घेऊन येतील. आपल्या द्रष्ट्या व जाणता राजाचे व्यक्तिमत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवता येईल, आपल्या इतिहासासोबतच नीतीमूल्ये आणि कर्तव्यांची जाणीव नव्या पिढीला होऊन एक सशक्त समाज तयार होण्यासाठी मदत होईल, असा आशावादही यावेळी जगदीश कदम यांनी व्यक्त केला.

नुकतेच फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीचे औचित्य साधत शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्याचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या टप्प्याचे एक मुख्य आकर्षण म्हणजे विशेष असे टाईम मशीन थिएटर. हे थिएटर शिवप्रेमींसाठी एक पर्वणी ठरत असून यामधील कालकुपीत बसून आपण सुमारे काही हजार वर्षे मागे जातो व तेथून शिवाजी महाराजांचा काळ दृक श्राव्य पद्धतीने अनुभवितो. यामध्ये महाराजांशी संबंधित कथा या आधुनिक तंत्रज्ञानाचा माध्यमातून शिवप्रेमींना अनुभवता येतात. यासाठी मॅपिंग, होलोग्राफी, फिजिकल इफेक्ट्स व सर्वात महत्वाचे म्हणजे ३६० अंशामध्ये फिरणारे रोटेटिंग अर्थात फिरते थिएटर यांचा प्रामुख्याने अनुभव घेता येणार असून या कालकुपीच्या थिएटरमध्ये एका वेळी १०० व्यक्ती विशेष अशा ३६ मिनिटांच्या शोचा अनुभव घेऊ शकतात.

याशिवाय शिवसृष्टीमधील दुर्गवैभव’, ‘रणांगण’ ही दालने, महाराजांच्या आग्राहून सुटकेचा थरार उभा करणारे दालन, प्रत्यक्ष शिवराय आपल्याशी संवाद साधत असल्याचा अनुभव देणारे ‘श्रीमंत योगी’ हे दालन, राज्याभिषेकाचा देखावा असलेला ‘सिंहासनाधिश्वर’ हे दालन, महाराजांच्या काळात काढलेल्या व सध्या जगातील प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये असलेल्या महाराजांच्या चित्रांच्या (पेंटिंग्ज) हाय रेझोल्युशन इमेजेसच्या प्रिंट्स, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या लढायांची माहिती देणारे दालन, प्रतापगडावर असलेल्या तुळजा भवानी मातेच्या मंदिराची प्रतिकृती आणि गंगासागर तलाव आदींना भेट देत शिवकाळाचा प्रत्यक्ष अनुभवच शिवप्रेमींना घेता येणार आहे.

याबरोबरच शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यात ६५ हजार स्केअर फूट जागेवर रायगडावरील राज्याभिषेक सोहळा साकारण्यात येणार असून राज्याभिषेक सोहळा अनुभविलेला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झिंन्टन याने वर्णन केलेला राज्याभिषेक येथे होलोग्राफी, ऑग्मेंन्टेड रिअलिटी (एआर) व व्ही आर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे साकारण्यात येईल. इंडिगो एअरलाईन्सच्या सीएसआरच्या यासाठी तीस कोटी रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली असून हा राज्याभिषेक सोहळा शिवप्रेमींना तिसऱ्या टप्प्यात अनुभविता येईल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!