मराठी

देशातील कर्तबगार स्त्रियांचा आदर्श विद्यार्थिनींनी घ्यावा: उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

मीराबाईंच्या भजनाचे गायन आणि विवेचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून विशेष बक्षीस जाहीर

Spread the love

मुंबई,  :देशातील कर्तबगार स्त्रियांचा आदर्श आजच्या विद्यार्थिनींनी घेऊन आपापल्या क्षेत्रात अग्रेसर राहिले पाहिजे, असे गौरउद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले.

सिडनहॅम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि आशिया खंडातील पहिल्या महिला वाणिज्य पदवीधर श्रीमती यास्मिन खुर्शीदजी सर्वेअर यांच्या पदवीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला कर्मचारी श्रीमती यास्मिन सर्वेअर यांच्या सन्मानार्थ बँकेच्या प्रायोजकत्वाने महाविद्यालयात स्थापित केलेल्या श्रीमती सर्वेअर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कु. यास्मिन सर्वेअर यांनी १८ ऑगस्ट १९२५ रोजी सिडनहॅम महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली होती. त्या काळात महिलांसाठी उच्च शिक्षण घेणे हे दुर्मिळ मानले जात असल्याने त्यांचा हा प्रवास ऐतिहासिक ठरला आहे. आज वाणिज्य क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या महिलांना श्रीमती यास्मिन सर्वेयर यांनी शंभर वर्षांपूर्वी वाणिज्य विभागाचे दालन खुले करून दिले. आजच्या विद्यार्थिनींसाठी त्या प्रेरणास्थान आहेत. यावर्षीपासून महाविद्यालय व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सिडनहॅम महाविद्यालयात वाणिज्य विभागात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनी साठी श्रीमती यास्मिन सर्वेयर यांच्या नावाने एक लाख रुपयांची विशेष शिष्यवृत्ती सुरू करण्यात येत आहे.

माजी विद्यार्थिनी व प्रसिद्ध पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे यांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या मिराबाई यांच्या रचना सादर केल्या. याचे औचित्य साधून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविद्यालयासाठी एका नवीन स्पर्धेची घोषणा केली. दर महिन्याला मीराबाईंची एक रचना संजीवनी भेलांडे देतील, त्याचे अर्थपूर्ण विवेचन स्वतःच्या आवाजात करणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनीस पंचवीस हजारांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. या उपक्रमाची सुरुवात आतापासूनच करूयात असे आवाहनही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सभागृहातील विद्यार्थ्यांना केले.

मीराबाईंच्या भजनाचे गायन आणि विवेचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस जाहीर

उपस्थित विद्यार्थ्यांपैकी मीराबाईंच्या भजनाचे वाचनआणि विवेचन करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रुपये दहा हजार रोख बक्षीस दिले.
राज्यातील एकल महिलांच्या सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी राज्य शासन त्यांना पेन्शन आणि व्यवसाय उभारण्यासाठी मदत करण्याच्या विचारात आहे. तसेच डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये होणाऱ्या नाविन्यपूर्ण विविध कोर्सेस आणि उपक्रमांचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कौतुक केले.
यावर्षीपासून महाविद्यालय व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सिडनहॅम महाविद्यालयात वाणिज्य विभागात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनी साठी श्रीमती यास्मिन सर्वेयर यांच्या नावाने एक लाख रुपयांची विशेष शिष्यवृत्ती सुरू करण्यात येत आहे, अशी घोषणा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी
यावेळी केली.

या कार्यक्रमास मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत, सिडनहॅमच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती दिलनवाज वारीयावा, प्रसिद्ध पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे, यास्मिन सर्वेयर यांचे नातेवाईक श्री सोली कूपर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या श्रीमती पाॅपी शर्मा, सिडनहॅम महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास धुरु यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. श्रीनिवास धुरु यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!