नापीक होणाऱ्या जमिनींचा दर्जा राखण्यासाठी ‘गाव तिथे भूमी सुपोषण अभियान’
सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह, यांच्या सहयोगाने आयोजन : आत्मनिर्भर ग्राम यात्रेसाठी ही पुढाकार

पुणे .सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह, राष्ट्रीय कर्तव्य अभियान यांच्या सहयोगाने ‘गाव तिथे भूमी सुपोषण’ आणि ‘आत्मनिर्भर ग्राम यात्रा’ या उपक्रमाचे आयोजन पुणे जिल्ह्यातील कडूस या गावी करण्यात आले आहे. दिनांक ३० मार्च ते ३० एप्रिल या दरम्यान हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती विजय वरुडकर यांनी दिली.
गाव तिथे भूमी सुपोषण या उपक्रमांतर्गत नापिक होणाऱ्या जमिनी वाचविण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. शेतकरी उत्पादक गट, बचत गट, गोशाळा यासोबतच सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थाचा यामध्ये सहभाग असणार आहे. ग्राम विकास, अक्षय कृषी परिवार, बॉश इंडिया फाऊंडेशन, रामभाऊ म्हाळगी विद्यालय, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच इतर स्थानिक पातळीवरील बचत गटांचा व सामाजिक समुहांचा या उपक्रमात सहभाग घेण्यात आला आहे. यामध्ये ३५ पेक्षा अधिक गावे आणि २० वाड्या वस्त्यांचा सहभाग असणार आहे.
आत्मनिर्भर ग्राम यात्रेअंतर्गत आत्मनिर्भर कृषी संकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे केंद्र आणि राज्य सरकारच्या सध्याच्या नैसर्गिक शेती धोरणांतर्गत योजनांची गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित केली जाईल. तसेच, लोकसहभागाच्या माध्यमातून कृषी आणि ग्रामविकासावर आधारित नवीन योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
विजय वरुडकर म्हणाले, मातीचा दर्जा खालावत चालल्याने देशातील ३० टक्के जमीन नापिक होण्याता धोका असल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे. शाश्वत शेतीसाठी मातीचा दर्जा राखणे आवश्यक आहे. मातीचा दर्जा सुधारण्यासाठी जनजागृती व्हावी, यासाठी गाव तिथे भूमी सुपोषण व आत्मनिर्भर ग्राम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरेश जाधव, विनय कानडे, रोहीत बलुरे, मधुकर भोसले, सुरेश जोशी, शरद दिघे, स्वप्नील गंगणे, सुनील व्हरांबळे, नंदकुमार भोपे, महेश कड, संतोष सुरवसे, किसन गारगोटे इतर अनेकजन या विषयी नियोजन करत आहेत.