तब्बल २० हजार पुणेकरांना मोफत मिसळ वाटप करून एकतेचा संदेश
महापुरुष अभिवादन कृती समितीच्या वतीने आयोजन

पुणे : महापुरुष अभिवादन कृती समिती च्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तब्बल २० हजार पुणेकरांना मोफत मिसळ वाटप करून एकतेचा संदेश देण्यात आला. समाज परिवर्तनाला दिशा व चालना देणारे साहित्य निर्माण करणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.
सारसबागेसमोरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाशेजारी भव्य एकता मिसळ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमाचे तिसरे वर्ष होते. यावेळी विविध पक्षाचे आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी उपक्रमाला भेट दिली. रविंद्र गुडमेटी, महेंद्र मारणे, रुपेश चांदेकर, मंगेश सांगळे, राजेंद्र पायगुडे, पियुष शहा, नंदा पंडीत, संतोष पंडीत, विजय रजपूत, दिलीप वाघमारे, जयेश कसबे, सिध्दार्थ वंजारे, सचिन विप्र, दत्तात्रय घारमळकर आदींनी उपक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.
केसनंद येथील सुप्रसिद्ध जोगेश्वरी मिसळचे सचिन हरगुडे आणि सहकारी यांनी ही मिसळ तयार केली. यावेळी पुणेकरांनी मोठ्या संख्येने मिसळ खाण्याचा आस्वाद घेतला. अण्णा भाऊ साठे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात त्यांच्या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. अशा या साहित्यरत्नाला ‘वाचन चळवळ’ या उपक्रमाद्वारे देखील अभिवादन करण्यात येत आहे. याकरिता तब्बल १ लाख पुस्तकांचे संकलन करण्याचा संकल्प समितीने केला आहे.