मनोरंजनमराठीमहाराष्ट्रशहर

आज गीतरामायणातील पहिले गीत सादर झाले

१ एप्रिल १९५५ ला रामनवमीच्या मुहूर्तावर गीतरामायणातील पहिले गीत सादर झाले.

Spread the love

पुणे. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर व ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या आणि गेली सहा दशके मराठी मनावर रुंजी घालणाऱ्या ‘गीतरामायणा’चे ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती’ हे पहिले गीत आकाशवाणी पुणे केंद्रावरून १ एप्रिल १९५५ रोजी प्रसारित झाले होते. त्याला आज ६७ वर्षे पूर्ण होतआहेत. सीताकांत लाड ५४ च्या काळात पुणे आकाशवाणी केंद्रावर स्टेशन डायरेक्टर म्हणून कामावर होते. सीताकांत लाड यांची ही संकल्पना. त्यांना समाजप्रबोधन असलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करायचा होता. त्यांचे अगदी जवळचे मित्र गदिमा यांना लाडांनी आपली कल्पना सुचवली. गदिमांनाही कल्पना भावली आणि वाल्मिकींच्या ‘रामायणा’वरून गीतरामायणाची निर्मिती झाली. त्याकाळी संगीतकार सुधीर फडके यांचा संगीत क्षेत्रात गवगवा होता. बाबुजी गदिमांचेही जवळचे मित्र. त्यामुळे गदिमा, सीताकांत लाड आणि बाबुजी अर्थात सुधीर फडके या त्रिमूर्तींनी एकत्र येऊन #गीतरामायण जनमानसांपर्यंत पोहोचविले. ठरल्याप्रमाणे वर्षभर ही मालिका चालणार होती. त्यानुसार ५२ भाग प्रसारित करण्याचे ठरविले होते. १९५५ सालच्या रामनवमीला सुरू होऊन १९५६ सालच्या रामनवमीपर्यंत गीतरामायण प्रसारित करण्याचे ठरले. त्याप्रमाणे दर शुक्रवारी सकाळी ८.४५ वा. आकाशवाणीवरून लोक गीतरामायण ऐकायचे. हाच भाग शनिवारी व रविवारी पुन्हा त्याचवेळी ऐकविला जायचा. योगायोग असा की, यंदाच्या वर्षाप्रमाणे ५५ सालीही अधिक मास होता. त्यामुळेच ५२ भागांवरून ५६ भाग झाले. अर्थात ५६ गाण्यांची निर्मिती झाली.
                                                 

 पहिल्या गीताच्या स्मृती

‘आकाशाशी जडले नाते’ या विद्याताई माडगुळकर (गदिमांच्या पत्नी) यांच्या आत्मचरित्रात विद्याताईंनी पहिल्या गीताच्या स्मृती जाग्या केल्या आहेत. विद्याताईंच्या म्हणण्याप्रमाणे गदिमांनी एक दिवस आधी पहिले गीत बाबुजींना दिले होते. बाबुजींचे म्हणणे की, गदिमांनी त्यांना ते गीत दिलेच नव्हते. गीतरामायणातील पहिले गीत प्रसारित करण्यासाठी आकाशवाणीवर सारे एकत्रित आले तर गीताची प्रतच नाही. गदिमा म्हणाले, आपण दिले आहे पण बाबुजी नाहीच म्हणतात. गदिमा भडकले व जायला निघाले. परंतु लाडांनी त्यांना अडविले व एका खोलीत नेऊन पुन्हा गीत लिहायला लावले व बाहेरून खोलीची कडी लावली. गदिमांनी अवघ्या पाच-दहा मिनिटांत गीत लिहिले आणि ते बरोबर १ एप्रिल १९५५ रोजी सकाळी ८.४५ वा. अवघ्या जनतेला ऐकविले गेले. ते गीत म्हणजे ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती कुश लव रामायण गाती!’
गदिमांचे शब्द आणि बाबुजींचे संगीत
गदिमांच्या शब्दांना स्वरसाज चढवून बाबुजींनी गीतरामायणातून अजरामर बनविले. रामायणातील सप्तकांडे अर्थात बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किशकिंदाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड या सातही कांडांच्या आधारे गदिमांनी ५६ गीतांची निर्मिती केली. संपूर्ण रामायणाची कथा रसिक श्रोत्यांसमोर मांडून गदिमांनी आधुनिक वाल्मिकी म्हणून नाव मिळविले. गीतरामायण प्रत्येकाच्या ओठावर येऊ लागले. त्याकाळातील कित्येकजण आपल्या आठवणी सांगतात. पुढे वर्षभर गीतरामायण चालले आणि घराघरांत नवचैतन्य उसळले. गीतरामायणाच्या पुस्तिकांचे प्रकाशन झाले. लोक नव्या उमेदीने या पुस्तिका खरेदी करू लागले. ३ ऑक्टोबर १९५७ साली आकाशवाणीने या पुस्तिकाचे प्रकाशन करून आणखीन एक क्रांती घडविली.

भारतीय शास्त्रीय संगीतातील रागांवर आधारलेली गीते

बाबुजी त्याकाळी बहुचर्चेत होते. भावगीत निर्मितीमध्ये त्यांचा हातखंडा होता. भारतीय शास्त्रीय रागांच्या आधारे ते गीतांना स्वरसाज चढवायचे. गीतरामायणातही त्यांनी भारतीय रागांचा समावेश करून गाण्यांना स्वरसाज चढविला. गीतरामायणातील गीते गायीली डॉ. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, राम फाटक यांनी. लता मंगेशकर संगीत क्षेत्रात नवीनच होत्या. त्यांनीही गीतरामायणातील काही गीते गायिली आहेत. त्याशिवाय ललिता फडके, मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी देसाई, बबन नावडीकर, जानकी अय्यर, सुमन माटे, कालिंदी केसकर इत्यादींनीही गीतरामायणातील गीते गायिली आहेत. मनाला भावविभोर करणारे संगीत व हृदयामध्ये भक्तीचा ओलावा करणारे शब्दसामर्थ्य, जनमानसाला गीतरामायणाने जणू नादावून सोडले होते. बालमनावर योग्य संस्कार होऊ लागले. घरातील बायका-पुरुष आवर्जून गीतरामायण ऐकू लागले. एकप्रकारे संस्कार करणार्याा गीतरामायणाने तो काळ जिंकला होता. रसिकमनांवर अधिराज्य गाजवून नवीन पिढीला सुसंस्कृत बनविण्याचे सामर्थ्य गीतरामायणात होते, आहे, आणि पुढेही राहील.
आकाशवाणीनंतर पहिला कार्यक्रम पंचवटीत
आकाशवाणीनंतर काही निवडक गीतांचा कार्यक्रम बाबूजी करू लागले आणि पहिला कार्यक्रम झाला तो गदिमांच्या पुणे येथील पंचवटीत, २८ मे १९५८ साली. आकाशवाणीवर गीतरामायणातला उदंड प्रतिसाद लाभला आणि पुन्हा एकदा गीतरामायणाचे प्रसारण करण्यात आले. १९६५ साली एचएमव्हीने ग्रामोफोन रीकॉर्डस् काढल्या. यालाही लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पूर्वीच्या काळी रेडिओ सगळ्यांकडेच नसत. परंतु शेजारच्या घरात एकत्र होऊन गीतरामायण ऐकले जायचे.

गीतरामायणातील अजरामर गीते
स्वये श्री रामप्रभू, शरयू तीरावरी, उगां कां काळीज माझे उले, उदास कां तू?, दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला गं सखे, सावळा गं रामचंद्र, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, मार ही त्राटीका रामचंद्रा, चला राघवा चला, आज मी शापमुक्त झाले, स्वयंवर झाले सीतेचे, व्हायचे राम अयोध्यापती, मोडू नका वचनास, नको रे जाऊ रामराया, रामाविण राज्यपदी कोण बैसतो?, जेथे राघव तेथे सीता, थांब सुमंता थांबवी रे रथ, नकोस नौके परत फिरू, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, बोलले इतुके मज श्रीराम, दाटला चोहीकडे अंधार, माता तू न वैरीणी, चापबाण घ्या की, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, तात गेले माय गेली, कोण तू कुठला राजकुमार, सूड घे त्याचा लंकापती, मज आणून द्या तो, याचका थांबू नको दारात, कोठे सीता जनक नंदिनी, ही तिच्या वेणीतील फुले, पळविली रावणे सीता, धन्य मी शबरी श्रीरामा, सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला, वाली वध ना खल निद्रालन, असा हा एकच श्रीहनुमान, हीच ती रामाची स्वामीनी, नकोस करू वल्गना, मज सांग अवस्था दूता, पेटवी लंका हनुमंत, सेतू बांधा रे सागरी, रघुवरा बोलत कां नाही?, सुग्रीव हे साहस असले, रावणास सांग अंगदा, नभ भेदूनी नाद चालले, लंकेवर काळ कठिण, आज कां निष्फळ होती बाण, भुंवरी रावणवध झाला, लिनते चारुते सीते, लोकसाक्ष शुद्धी झाली, त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजयकार, प्रभो मज एकच वर द्यावा, डोहाळे पूरवा रघुकुलतिलक, मज सांग लक्ष्मणा, गा बाळांनो श्रीरामायण अशी अजरामर गीते आजही प्रत्येकाच्या ओठांवर स्फुरतात आणि अलौकिक अशा अनुभूतींचा साक्षात्कार होतो.
असे हे अजरामर गीतरामायण!..

शशिकांत पाटोळे
विश्वस्त, द्वारकामाई सोशल फाउंडेशन,
बोपोडी पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button