सायबर चोरट्यांनो खबरदार! गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी CM फडणवीसांचे महत्वाचे निर्देश

मुंबई. सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सायबर गुन्ह्यांमधील तपासात सायबर प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी शासन प्रयोगशाळा निर्माण करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर प्रयोगशाळांचे जाळे अधिकाधिक सक्षम करण्याच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दक्षिण मुंबई विभागाच्या निर्भया सायबर प्रयोग शाळेचे डी. बी. नगर पोलीस स्टेशन येथे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच मुंबई (मध्य) भागासाठी वरळी पोलीस स्टेशन येथील व मुंबई (पूर्व) भागासाठी गोवंडी पोलीस स्टेशन येथील सायबर प्रयोगशाळांचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
गुन्हा लपवण्यासाठी किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणातील डाटा डिलीट केल्यास, मोबाईलची तोडफोड केल्यास किंवा मोबाईल टेम्पर केल्यास अशा सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील सर्व डेटा आधुनिक संगणक प्रणालीच्या सहाय्याने ‘ रिकव्हर ‘ केला जाणार आहे. प्रयोगशाळा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून अद्ययावत संगणक प्रणालीने (सॉफ्टवेअर) सक्षम आहेत.
मुंबई शहरात पाच सायबर प्रयोगशाळा प्रस्तावित आहेत. यापैकी तीन प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळांच्या माध्यमातून विशेषत्वाने सायबरच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे कमी कालावधीत सिद्ध करता येणार आहे. जगातील या क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान या प्रयोगशाळांमध्ये उपयोगात आणले जाणार आहे. आर्थिक गुन्हेगारी संदर्भात ऑनलाईन पद्धतीने परस्पर पैशांची हेराफेरी करणे, बँक खाते हॅक करणे अशा पद्धतीच्या गुन्ह्यांवरही प्रयोगशाळेच्या माध्यमातून नियंत्रण मिळविण्यात येणार आहे.
*मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय*
जन्मजात किंवा काही कारणास्तव दिव्यांगत्व आलेल्या दिव्यांग बांधवांना आयुष्य जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांगत्वावर मात करीत आपल्या जीवनात उत्कर्षाचा मार्ग शोधावा लागतो. अशा दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात समृद्धी निर्माण करण्यासाठी काल सुसंगत नवनवीन योजना, धोरणांची निर्मिती करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणांची योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या. सह्याद्री अतिथिगृह येथे दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.