लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिरात वीर पत्नी- मातांच्या उपस्थितीत सैनिकांना सलाम
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट : नागरी सज्जता सूची ची वितरण

पुणे : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने देशवासीयांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि सैनिकांना अभिवादन करण्यासाठी वैशाख पौर्णिमा निमित्त श्री दत्त मंदिरात वीर माता -पत्नीच्या हस्ते माध्यान्ह आरती आणि सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. आनंद सराफ, शिरीष मोहिते व वीर पत्नी दिपाली मोरे यांनी यासाठी नियोजन केले.
नयना बेंद्रे व कर्नल नवीन बालकृष्ण बेंद्रे (निवृत्त) यांच्या हस्ते दत्तयाग संपन्न झाला. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अॅड. रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अॅड. शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते.
विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की युद्धजन्य संकट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी जागरूक आणि शांत राहावे. संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा. अफवा पसरवू नका. केवळ खात्रीलायक माहितीच शेअर करा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. प्रथमोपचार पेटी, वैद्यकीय आणि ओळखपत्रांची कागदपत्रे तयार ठेवा. प्रत्येकासाठी एक आपत्कालीन बॅग तयार ठेवा. शांत रहा. मनोबल वाढवा. एकमेकांच्या मदतीला धावून जा. सैनिकांबद्दल आदर ठेवा आणि देशासाठी प्रार्थना करा, अशी नागरी सज्जता सूची यावेळी वितरीत करण्यात आली.
ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे म्हणाले, आपले वीर सैनिक आपल्याला सुरक्षितता मिळावी म्हणून लढले. त्यांच्या रक्षणासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सामूहिक प्रार्थना करणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात वीर माता -पत्नीच्या हस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले होते.