अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे ११०० दिव्यांचा दीपोत्सव
उत्सव हा आनंदाचा क्षण_राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

पुणे : आजचे स्पर्धेचे युग असून हा प्रत्येकाला दगदगीचा काळ आहे. इथे कोणालाही शांती नाही. उत्सव हा आनंदाचा क्षण असतो, तो एकामेकांनी वाटून घ्यायला हवा. उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येऊन चर्चा करीत परमेश्वराला प्रत्येकजण साकडे घालतो, असे मत राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट चा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला. यावेळी हिंदू धर्मगुरु प.पू. कालीपुत्र कालीचरण महाराज, पी.एन.जी. ज्वेलर्सचे पराग गाडगीळ, अभिनेता अथर्व कर्वे, उद्योजक अमोल येमूल, राहुल येमूल, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमात मूकबधिर व कर्णबधीर मुलांसाठी कार्यरत असलेल्या इंडिया डिफ सोसायटी, कात्रज या सामाजिक संस्थेला १० हजार रुपयांची आर्थिक मदत देखील देण्यात आली. तसेच ११०० फिरते दीप लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती.
दत्तात्रय भरणे म्हणाले, आयुष्यात आनंद द्यायचा असतो आणि घ्यायचा असतो. जेवढा पुढच्या माणसाला आनंद देऊ, त्याच्या दहापट आपल्याला व आपल्या कुटुंबाला मिळतो. या सुंदर आयुष्यात जेवढी मदत व सहकार्य करता येईल, याचा प्रयत्न करायला हवा. मिळालेल्या संधीचे सोने करता येईल, हे बघायला हवे, असेही त्यांनी सांगितले. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. .