मोठी स्वप्न बघून त्यांचा पाठलाग करा _ जेष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे तीन संस्थाना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत

पुणे : प्रत्येकाची सुरुवात अत्यंत छोटया प्रमाणात असते. त्यामुळे माणसाने उमेद सोडता कामा नये. आपाल्याला काय व्हायचे आहे, हे ध्येय ठरवायला हवे. आपण जसा विचार करतो, तसे परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यात घडवत असतो. त्यामुळे मोठी स्वप्न बघून त्यांचा पाठलाग करा. तसेच कष्ट करून प्रामाणिकपणे काम करा, असा सल्ला ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी दिला.
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट चा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये तीन सामाजिक संस्थांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. कार्यक्रमाला रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तुषार पाचुंदकर, श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव उपस्थित होते.
खेळाडूंसाठी कार्यरत असलेले सारथ्य फाऊंडेशन पुणे, अनाथ व निराधार मुलांसाठी कार्यरत आंदग्राम गुरुकुल निमगाव आणि द्रारिद्र्य रेषेखालील मुलांसाठी कार्यरत विवेकानंद केंद्र पुणे या तीन संस्थांना ५१ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
डॉ. राजेंद्र खेडेकर म्हणाले, भारतीय पारंपरिक वाद्यांना उत्सवांमध्ये स्थान मिळायला हवे. पुण्यातील उत्सवांमध्ये हे स्थान मिळू शकते. सार्वजनिक मंडळे व संस्था उत्तम सामाजिक कार्य करीत आहेत. त्यामुळे समाजसेवेचा श्वास ही सगळी मंडळे आहेत, असेही त्यांनी सांगितले. तुषार पाचुंदकर यांनी मनोगत व्यक्त केले. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.