शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्यांनी अनुभवले प्रेमाचे आणि सन्मानाचे क्षण

पुणे . फिटे अंधाराचे जाळे…. झाले मोकळे आकाश……. या गीतकार सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या ओळी आज हजारो पुणेकरांच्या साक्षीने जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या दोन कैद्यांनी अक्षरश: प्रत्यक्ष अनुभवल्या.
अनिल आणि सुनील (नावे बदलली आहेत) हे दोघेही जन्मठेप शिक्षा भोगत होते. कारागृहात असताना त्यांचे चांगले वागणुकीमुळे त्यांचे सर्व अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण झाले. शिक्षा संपून बाहेर आल्यानंतर काय करावे ते त्यांना सुचत नव्हते. कारण कुटुंबियांची वाताहत झालेली, कोणी जवळ घेत नाही, कोणी बोलत नाही ,मदत करायला कोणी तयार नाही, मित्र नाही ,नातेवाईक नाहीत …अशा वातावरणात त्यांच्या दोघांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले पण नेमकं याच क्षणी काही पुणेकर पुढे आले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली.
भोई प्रतिष्ठान पुणे ,आदर्श मित्र मंडळ पुणे यांच्यावतीने गेली दहा वर्षे कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर आणलेल्या बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
प्रेरणापथ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यामध्ये मुख्यतः शिक्षा भोगून बाहेर आलेल्या कैद्यांना रोजगार आणि व्यवसाय उभे करून देणे हा महत्त्वाचा भाग आहे. कारण त्यांना जर रोजगार दिला नाही तर ते पुन्हा व्यसने आणि गुन्हेगारीकडे वळतात. हाच विचार लक्षात घेऊन आतापर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून25 पेक्षा जास्त कैदी बांधवांनी स्वतःच्या पायावर उभे राहून समाजात ताठ मानेने जगण्याचा संकल्प केला आहे ,आणि तो पूर्णत्वास गेला आहे.
याच शृंखलेत नुकतेच दोन कैदी बांधवांना भेळ आणि पाणीपुरीचा स्टॉल सुरू करून देण्यात आला. भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या या प्रेरणापथ प्रकल्पासाठी मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग मित्र मंडळाने शतकोत्तर रोप्य महोत्सवानिमित्त विशेष पुढाकार घेऊन या बंदीजणांचे नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी साक्षात महागणपतीचा आशीर्वादाचा हात पुढे केला.
या बंदी बांधवांच्या नवीन आयुष्याची सुरुवात केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार मंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः या स्टॉलचे उद्घाटन भेळ आणि पाणीपुरी खाऊन केल्यानंतर या दोघांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू तरळले.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केवळ स्वतःभेळ आणि पाणीपुरी खाऊन त्याचे पैसे देऊन या दोन मित्रांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा द्यावेत असे आवाहन करताच बहुसंख्य पुणेकरांनी त्यांचे अनुकरण केले आणि पहिल्याच दिवशी या दोन मित्रांची आयुष्याची गाडी रुळावर आली.
प्रेरणापथ प्रकल्पाचे समन्वय भोई प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा. डॉ.मिलिंद भोई यांनी याप्रसंगी बोलताना शिक्षा भोगून बाहेर आलेल्या कैद्यांना समाजात सन्मानाने आणि प्रेमाने उभे राहण्यासाठी गेली दहा वर्षे हा प्रकल्प सुरू असल्याचे सांगून संपूर्ण राज्यातील कैदी बांधव याचा लाभ घेत असल्याची माहिती दिली.
प्रेरणापथ प्रकल्पाचे संयोजक सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांनी या उपक्रमाच्या आयोजनामाची भूमिका स्पष्ट करताना कैद्यांशी बाहेर आल्यानंतर त्यांना जर आपण प्रेम दिले तर त्यांच्यातील चांगला माणूस हा निश्चित समाजासमोर येतो आणि काहीतरी चांगले काम करतो असे सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते कृष्णकुमार गोयल यांनी या दोन्ही बांधवांना भांडवलासाठी मदत केली आणि स्वतः भेळ आणि पाणीपुरी खाऊन त्यांचा उत्साह वाढवला.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग मंडळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजनात सक्रिय सहकार्य करून इतरांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला.
याप्रसंगी पोलीस उप महानिरीक्षक व महाराष्ट्र राज्य अमली पदार्थ विरोधी पथकाचे समन्वयक श्री प्रवीण पाटील, आ. हेमंत रासने, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, ज्येष्ठ विधीज्ञ एड. प्रताप परदेशी, तुळशीबाग मंडळाचे सजावट कार श्री सुभाष सरपाले, विविध गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष श्री विकास पवार ,उपाध्यक्ष विनायक कदम ,कोषाध्यक्ष नितीन पंडित, विश्वस्त श्री दत्ताभाऊ कावरे, ऍड. राजेश दातार, श्री मोहन साखरीया, श्री मयूर दिवेकर, श्रीमती अभिनेत्री वाळके, श्री सागर पेदी, लखन वाघमारे , नरेंद्र गायकवाड यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.