भारतीय ज्ञान परंपरातील करियरच्या संधी’ विषयावर शनिवारी चर्चासत्र
भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टिम आणि भरत नाट्य संशोधन मंदिराचा उपक्रम

पुणे : भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टिम आणि भरत नाट्य संशोधन मंदिर यांच्या सयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १९ जुलै रोजी ‘भारतीय ज्ञान परंपरातील करियर संधी’ (आय. के. एस. अर्थात इंडियन नॉलेज सिस्टीम) या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून मान्यवर वक्त्यांकडून आपल्या प्रश्नांचे शंकासमाधानही करून घेता येणार आहे.
निःशुल्क प्रवेश असलेले चर्चासत्र सकाळी ९:४५ ते १०:४५ या वेळात भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टिमचे संचालक प्रा. क्षितिज पाटुकले यांनी आज (दि. १६) पत्रकार परिषदेत दिली. सर्व वयोगटासाठी चर्चासत्र खुले आहे.
भारतीय संस्कृती आणि परंपरा हजारो वर्षे जिवित आणि प्रवाहित आहेत. संपूर्ण जगात अत्यंत विकसित अशी ही संस्कृती होती. येथे सोन्याचा धूर निघत असे. त्याचे कारण प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीतील ज्ञान, गुरुकुल व्यवस्था, नालंदा, तक्षशिला सारखी विद्यापीठे, वेद, उपनिषदांसारखे ग्रंथ आणि त्यातील विद्वत्ता हे आहे. त्यातील मूलभूत सिद्धांत आणि जीवन प्रणाली यामुळे तेजस्वी आणि सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडत असत, त्यातून कर्तव्य तत्पर नागरिक आणि पुढे उन्नत राष्ट्र उभे रहात होते. आज मेकॉले पध्दतीच्या शिक्षण व्यवस्थेने गंभीर समस्या निर्माण केल्या आहेत. पाश्चात्य शिक्षण पद्धतीमुळे संपूर्ण जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे. जगभरातील युद्धे, ढासळत्या अर्थव्यवस्था, जागतिक तापमानवाढ, आतंकवादी कारवाया, अनिती, भ्रष्टाचार, वोकीझम, अनाचार, हिंसाचार, केवळ पैशामागे धावणारे जग, संस्कारहीन समाज… हे पाहिल्यावर जणू मानवाचे अस्तित्व धोक्यात आले आहे असे वाटते. अशावेळी जागतिक समस्यांची उत्तरे इंडियन नॉलेज सिस्टीम (IKS) म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आहेत, असे मत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नुकतेच व्यक्त केले आहे.
प्रख्यात करिअर कौन्सेलर विवेक वेलणकर, भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष, भांडारकर संस्थेचे विश्वस्त प्रदीपदादा रावत, प्रख्यात लेखक, इतिहास तज्ञ, अभिजित जोग, आय.के.एस. तज्ञ क्षितिज पाटुकले, प्रख्यात नाट्यकर्मी रवींद्र खरे, भरत नाट्य संशोधन मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे यांचा चर्चासत्रात सहभाग असणार आहे.
केंद्र सरकारने एनईपी 2020 राष्ट्रीय शिक्षा निती द्वारा इंडियन नॉलेज सिस्टीम (IKS) चा आग्रह धरला आहे. प्रत्येक महाविद्यालये, विद्यापीठे, शाळा, इन्स्टिट्यूट, कौशल्य केंद्र, सरकारी संस्था इ. सर्व ठिकाणी आय.के.एस.चे तज्ञ उपलब्ध असले पाहिजेत. यु.जी.सी. गाईडलाइन्स नुसार आय.के.एस.चे शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला अनिवार्य केले गेले आहे. प्रत्येक महाविद्यालयात आय.के.एस.चे केंद्र असणे हे नॅक मानांकनासाठी आवश्यक आहे. आजपर्यंत प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे आय.के.एस. मधील ज्ञानाचा आपण उपयोग केला नाही. आता तो करणे आवश्यक आहे. यामध्ये समस्या आहे ती म्हणजे आय.के.एस. तज्ञ, शिक्षक, प्राध्यापक, सल्लागार उपलब्ध नाहीत. तसेच आय.के.एस. भारतीय ज्ञान परंपरांची आणि त्यातील शिक्षणाची चर्चा होत आहे. मात्र आय.के.एस. शिकून पुढे करिअर कसे विकसित करता येईल, याविषयी संभ्रम आहेत. आय.के.एस. मध्ये करिअर याचे मार्गदर्शन मिळत नाही. म्हणूनच भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टिम पुणे यांनी भरत नाट्य संशोधन मंदिर यांच्या सहयोगाने हे चर्चासत्र आयोजित केले आहे.
आय.के.एस. मध्ये 1) शालेय शिक्षण 2) उच्च शिक्षण 3) महाविद्यालये आणि विद्यापीठे 4)रिसर्च संशोधन संस्था 5) कन्टेन्ट रायटिंग 6) कॉर्पोरेट ट्रेनिंग 7) वारसा आणि पर्यटन 8) मीडिया आणि एन्टरटेन्मेंट 9) आय.के.एस. साठी विदेशातील करिअर संधी 10) आय.के.एस. तज्ञ आणि सल्लागार – स्वतंत्र करिअर इ. क्षेत्रामध्ये कसे करिअर विकसित करता येईल यावर विचारमंथन होणार आहे. सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना आय.के.एस. मध्ये करिअर कसे करता येईल यावर मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. संपूर्ण देशात आणि देशाबाहेर आय.के.एस. तज्ञांची कशी गरज भासणार आहे, यावर चर्चा करण्यात येणार आहे.