इंडिगोच्या सेवेत सातत्याने त्रुटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना संदीप खर्डेकर यांचे निवेदन

पुणे, –इंडिगो विमानसेवेतील सातत्याने समोर येणाऱ्या त्रुटींबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्रवासी संदीप खर्डेकर यांनी केंद्रीय नागरी उड्डाण व सहकारिता राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे थेट निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी इंडिगोच्या व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
खर्डेकर यांनी आपल्या पत्रात स्वतःच्या व नातेवाईकांच्या प्रवासातील अनुभव सांगताना इंडिगो विमानसेवेतील विविध त्रुटींवर प्रकाश टाकला आहे. यात प्रामुख्याने विमानातील खराब आसन व्यवस्था, पावसात भिजलेल्या बॅग्ज, बॅगेज हँडलिंगची हलगर्जीपणा, ऑनलाईन सीट कन्फर्मेशनच्या नावाखाली प्रवाशांकडून अतिरिक्त रक्कम घेणे आणि मराठी भाषेचा अभाव यांचा समावेश आहे.
त्यांनी नमूद केले की,
- १३ जुलै रोजी नैरोबीसाठी प्रवास करताना विमानातील सीट व्यवस्थित न झुकल्याने त्रास झाला.
- परतीच्या प्रवासात देखील (सीट क्रमांक E-23) हाच त्रास अनुभवला गेला, परंतु तेव्हा हवाईसुंद्रीलाही सीट ठीक करता आली नाही.
- नैरोबीहून मुंबईला पोहोचल्यावर बॅगेज बेल्टवर अनेक बॅग्ज या भिजलेल्या अवस्थेत होत्या.
- प्रवासादरम्यान पोर्टरकडून बॅग्जची नीट हाताळणी न झाल्याने बॅग्ज खराब होतात.
- त्यांच्या नातेवाईकांच्या बाबतीत २१ सप्टेंबर २०२४ रोजी बॅग्जमधून नेकलेस हरवल्याचा अनुभव आला होता, मात्र कंपनीने केवळ ₹२,००० ची नुकसानभरपाई देऊन जबाबदारी झटकली.
- नवरा-बायकोला एकत्र बसण्यासाठी विमानतळावर सहकार्य न करणं, आणि कर्मचाऱ्यांचे अरेरावी उत्तर हे अपमानजनक वाटले.
- मराठी भाषेचा वापर न केल्याबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर खर्डेकर यांनी मा. ना. मुरलीधर मोहोळ यांना इंडिगोच्या प्रमुखांसोबत तातडीने बैठक घेऊन उपाययोजना कराव्यात अशी आग्रही मागणी केली आहे. महाराष्ट्रातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मराठीमध्ये सेवा उपलब्ध करून द्यावी, तसेच प्रवाशांचा सन्मान राखणारी व पारदर्शक प्रक्रिया राबवावी, असे आवाहन त्यांनी या निवेदनात केले आहे.
सदर विषयावर राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भूमिका काय असेल याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे.