कोणताही पुरस्कार स्वीकारणे म्हणजे केवळ गौरव नव्हे, तर त्या मागे जबाबदारी …. खांडेकर

पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी. चार दिवसांपूर्वी नवराष्ट्रचे पत्रकार आणि माझे मित्र श्री. बद्रीनाथ घुगे यांचा एक संदेश व्हॉट्सॲपवर आला. त्यांनी कळवले की नवभारत व नवराष्ट्र वृत्तपत्र समूहामार्फत “उत्कृष्ट प्रशासन अधिकारी” या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची त्यांनी नम्रपणे विनंती केली. पुढील चार-पाच दिवस त्यांनी वेळोवेळी फोन करून आग्रहही केला.
मात्र, मी एका संभ्रमावस्थेत होतो. कारण कोणताही पुरस्कार स्वीकारणे म्हणजे केवळ गौरव नव्हे, तर त्या मागे येणारी जबाबदारी आणि अपेक्षांची जाणीवही मनात होती.
मात्र जेव्हा कळले की या कार्यक्रमाला मा. श्री. दत्तामामा भरणे (क्रीडा व युवक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) आणि माझे मार्गदर्शक मा. श्री. चंद्रकांत पुलकुंडवार साहेब (विभागीय आयुक्त, पुणे) हे उपस्थित राहणार आहेत, तेव्हा हा सन्मान स्वीकारण्याचा निर्णय निश्चित केला.
कारण या दोन्ही थोर व्यक्तिमत्त्वांचे विचार ऐकणे, ही माझ्यासाठी एकच मोठी संधी होती.
कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाल्यावर मा. पुलकुंडवार साहेबांनी जे मनोगत व्यक्त केले, ते नेहमीप्रमाणे मन हेलावणारे आणि अंतर्मुख करणारे होते.
४० वर्षांपूर्वीची ग्रामीण स्थिती, नागरी व सांस्कृतिक बदल, व शेतकऱ्यांच्या हिताचे कामकाज या साऱ्या गोष्टी त्यांनी अत्यंत संयतपणे मांडल्या.
त्यांच्या शब्दातून समाजाविषयीचे प्रेम आणि प्रशासनातील संवेदनशीलतेची जाणीव प्रकर्षाने दिसून आली.
यानंतर माननीय दत्तामामा भरणे साहेबांनी केलेले मनोगत देखील अंतःकरणाला भिडणारे होते.
“तुम्ही आज नगरपालिकेत काम करता आहात हे तुमचे भाग्य आहे. या आव्हानांमधून तुमचा सर्वांगीण विकास होतोय. सामान्य माणूस हा तुमच्या कामाचा केंद्रबिंदू असला पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी आम्हा सर्व अधिकाऱ्यांना साद घातली.
आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांची सेवा करणे, त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवणे, हा भावनिक संदेश त्यांनी दिला, जो मनाला भिडणारा होता.
कोट
पुरस्कार स्वीकारताना मी खरोखर भारावून गेलो होतो. कारण हा पुरस्कार म्हणजे एक मोठी जबाबदारी आणि माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे, याची जाणीव त्याक्षणी झाली.
हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत राहीन, हे मी मनाशी ठरवले.
हा सन्मान मला नव्या उर्जेने भरून गेला आहे. या सन्मानामुळे अधिक चांगल्या प्रकारचे काम करण्याची ऊर्जा आणि बळ मिळाले आहे येणाऱ्या पुढील काळात प्रशासकीय आणि कौटुंबिक आयुष्यात यामुळे सकारात्मक काम करण्याची एक उमेश माझ्यामध्ये निर्माण झाली आहे.
या गौरवासाठी नवभारत व नवराष्ट्र वृत्तपत्र समूह, त्यांचे महाव्यवस्थापक व आयोजक मंडळी यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.माधव लक्ष्मण खांडेकर
मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद