डॉ. कलाम राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. अनंत देवगिरीकर यांना प्रदान
ए. डी. फाउंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने सन्मान

पुणे : सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, वारजे (पुणे) येथे कार्यरत असलेले प्रा. अनंत मारुती देवगिरीकर यांना ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले आहे. ए. डी. फाउंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा हा पुरस्कार प्रा. देवगिरीकर यांच्या अध्यापन क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या संवेदनशील, जिव्हाळ्याच्या भूमिकेची दखल घेत प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडला. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त वैशाली चव्हाण यांच्या हस्ते प्रा. अनंत देवगिरीकर यांना शाल, सुवर्णपदक, मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीराम मांडुरके, ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज, तनिष्का फाउंडेशनचे अनिल जाहीर, ए. डी. फाउंडेशनचे कार्याध्यक्ष महादेव महानोर, अध्यक्ष अशोक गोरड, अभिनेत्री ममता भोई आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच त्यांच्या पत्नी दिपीका देवगिरीकर ह्या ही उपस्थित होत्या.
प्रा. अनंत देवगिरीकर यांनी अल्पवयातच शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला असून, अध्यापनातील निष्ठा, नवोपक्रमशीलता आणि समाजभान यामुळे त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विचारशीलता, आत्मविश्वास आणि मूल्यसंस्कार निर्माण करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिक नव्हे तर मानसिक आणि सामाजिक विकास साधला जातो. याच विविध अंगांनी समृद्ध असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या सन्मानाबद्दल प्रा. देवगिरीकर यांचे सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.