स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीला लागा-अॅड.सुनील डोंगरे
राज्यात बसपा 'बॅलेन्स ऑफ पॉवर' ठरेल; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन

पुणे:-छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी बहुजन समाज पार्टीच प्रबळ पर्याय आहे. ‘सर्वजण हितार्थ, सर्वजण सुखार्थ’ बसपाची विचारधारा समाजकारणासह राजकारणातही नव प्रेरणा देणारी आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे ‘हत्ती’ निवडणूक चिन्ह असलेला पक्षाचा निळा झेंडा घरोघरी पोहचवा, असे आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.सुनील डोंगरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत राज्याचे प्रभारी रामचंद्र जाधव, प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी, अॅड.संजीव सदाफुले, अप्पासाहेब लोकरे, दादाराव उईके, पुणे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्यासह जिल्हा प्रभारी, जिल्हा कमिटी सदस्य, विधानसभा अध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुरोगामीत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संत,पुरूषांच्या विचारानूसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारसा पुढे चालवणाऱ्या बसपाचे हात अधिक बळकट करा. राज्यातील सत्ताधारी आणि प्रस्थापित राजकीय पक्षांसोबत बसपाची थेट लढत असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चौरंगी होतील, असे प्रतिपादन अॅड.डोंगरे यांनी केले.
बसपाचा कॅडर देशातील बहुजन विचारधारेला सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत, असे प्रदिपादन पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी केले. बसपाचा निश्चित असा ‘व्होट बॅंक’ आहे. कॅडरची मेहनत आणि मतदारांचा विश्वास या सूत्रावर बसपा ताकदीनीशी समोर येवून राज्यातील ‘बॅलन्स ऑफ पॉवर’ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पुरोगामी महाराष्ट्रात विकासवादी धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी बसपा आवश्यक आहे. केवळ फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा वापर करून सरकार स्थापन केले, तर ते बहुजनांचे सरकार ठरत नाही, असा टोला देखील डॉ.चलवादी यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.