लोकशाहीर रणझुंझार : अण्णाभाऊ साठे – आचार्य रतनलाल सोनग्रा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्यातील एक अद्भूत चमत्कार आहे. अत्यंत गरीब, उपेक्षित, अस्पृश्य, मातंग समाजात जन्म झालेल्या ह्या माणसाने सतत झुंज देत देत अपूर्व लोकप्रियता मिळवली.
या देशातील वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेत मानवीय जीवनाची ‘चाकोरी’निश्चित असते. कविवर्य सुरेश भट यांच्या शब्दांत –
‘हे दुःख राजवर्खी, ते दुःख मोरपंखी
जे जन्मजात दुःखी – त्यांचा उपाय नाही |’
अशा ‘जन्मजात’दुःखी मातंग समाजात दुष्काळाशी सामना करता करता त्यांचे आई-बाप केवळ जगण्यासाठी…. वाटेगाव ते मुंबई पायी निघाले. मोलमजुरी करीत करीत एक महिन्याने साठे कुटुंब पुण्याला पोचले.
पुण्याहून त्यांना एका कंत्राटदाराने वेठबिगार म्हणून घेतले. कल्याण येथे दगडाच्या खाणीत ठेवले. त्यातून कशीबशी सुटका करून त्यांनी मुंबई गाठली ! भायखळ्यात एका मुस्लीम म्हातारीने त्यांना खोली भाड्याने दिली.
त्या अफाट मुंबईत काम शोधत हमाली करता करता जगण्यासाठी मरणप्राय कष्ट करीत असता…. अण्णाभाऊंची ‘लाल बावट्या’शी ओळख झाली.
‘जगातील कामगारांनो एक व्हा’ – ’गमावण्यासारखे तुमच्याकडे काहीच नाही.’ या कार्ल मार्क्सच्या विचाराने अर्धे जग पादाक्रांत केले होते.
मुंबईत गिरणगावात साम्यवादी विचारधारा प्रबळ होती… भाषावार प्रांतरचनेतून मुंबई महाराष्ट्रातून वगळण्यात आली. मुंबईचे द्विभाषिक झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात कम्युनिस्ट पार्टीसह सर्व पक्ष सामील झाले. कलेच्या क्षेत्रात गरिबांच्या बाजूचा विचार नाटकांतून, चित्रपटांतून येत होता. मेहबूब यांचा ‘मदर इंडिया (१९५७)’ ‘जेमिनी’चा ‘समाज को बदल डालो (१९७०)’ राज कपूरचे चित्रपट – ख्वाजा अहमद, के. ए. अब्बास यांच्या कथा – उर्दूची जवळजवळ एक संपूर्ण पिढी – मोठमोठ्या शायरांच्या प्रगतीशील तत्त्वज्ञानाने भारावली होती.
अण्णाभाऊंनी आपल्या वाणी – लेखणीने कामगार शेतकरी कष्टकर्यांची बाजू मांडायला सुरुवात केली. शाहीर अमजद शेख यांचा बुलंद आवाज, अण्णा भाऊंची शब्दरचना आणि गव्हाणकरांची साथ यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला.
अण्णाभाऊंची ‘फकिरा’ कादंबरी प्रकाशित झाली. तिला राज्यशासनाचे पहिले पारितोषिक मिळाले. – फकिरावर मराठी चित्रपट काढण्याचे ठरले. मी त्यावेळी नुकताच महाविद्यालयात जाऊ लागलो होतो. आमचा नगर जिल्हा म्हणजे साम्यवाद्यांसाठी केरळच होते. नगरचे डॉ. श्रीराम रानडे हे सर्वसमावेशक व्यक्तित्व होते. अकोळनेर (ता. नगर) येथे फकिरा चित्रपटाचे चित्रीकरण ठरले. अण्णाभाऊंचा मुक्काम डॉ. रानडे यांच्या घरी होता. त्यांनी मला त्यावेळी ‘फकिरा’ ची प्रत भेट दिली. प्रसिद्ध साम्यवादी लेखक के. ए. अब्बास मार्गदर्शनासाठी आले होते. ख्वाजा अहमद अब्बास बरोबर साथ द्यायला, त्यांना हवं नको ते बघायला मी उत्साहाने तत्पर होतो. डॉ. रानडे यांच्या घरून रात्री उशिरा आम्ही फिरायला निघत असू. ‘फकिरा’ या चित्रपटात सूर्यकांत हे नायकाची भूमिका करीत होते. स्वतः डॉ. रानडे, सौ. कमला रानडे पती-पत्नींनी त्यात पाहुणे कलाकार म्हणून कामे केली होती. व्ही. शांताराम यांचे एक सहकारी कुमार चंद्रशेखर हे चित्रपटाचे दिग्दर्शक होते.
याच वातावरणातून मी साम्यवादी विचारसरणीकडे आकर्षित झालो होतो.
अण्णाभाऊ साठे हे एका जागतिक विचारसरणीबरोबर जुळले आणि त्यांच्यातील मौलिक तेज प्रकटले. त्यांनी जीवनसंघर्ष करणारी हजारो पात्रे निर्माण केली. प्रत्येक गोष्टीचे मांगल्य त्यांनी पाहिले. माणसाची दानत – स्त्रीचा सोशिकपणा, कष्टकर्यांची हिम्मत… पोटाची खळगी भरण्यासाठी चाललेली कसरत ! विषमतेचे भेसूर रूप ! त्यावेळी शासनाची दुष्काळी कामावर अधिकृत बारा आणे मजुरी आणि शासकीय वकिलाला १२ हजार रोजची बिदागी होती. हे अंतर हजार पटीचं ! अण्णा भाऊ जळत होते, लिहित होते. विविध भाषांत त्यांचे साहित्य भाषांतरित झाले. ते खर्या अर्थाने जागतिक कीर्तीचे मराठी साहित्यिक झाले.
वाटेगाव या लहानशा गावातून अस्पृश्य वस्तीत जन्मलेले अण्णा भाऊ साठे आपल्या कष्टाने, लेखणीने, मनातील अपार करूणेने लोकप्रिय झाले. त्यांनी रशिया अगदी मनापासून पाहिला… वारणेच्या तीरावरून व्होल्गेच्या काठावर त्यांचे कौतुक झाले !
अशी ही मैत्री
शाहीर अमर शेख यांचे अहमदनगरशी फार जवळचे संबंध होते. राहुरीजवळ त्यांनी आपल्या प्रकल्पासाठी जागाही घेतली होती. १९६२ साली चिनी आक्रमणानंतर मी साम्यवादी पक्षाचा त्याग केला. ‘पक्ष’ आणि ‘विचार’ या गोष्टी भिन्न आहेत – पक्ष हे संस्थात्मक कार्य असते. त्यासाठी त्याचे कठोर यमनियम असतात. त्यांच्या आंतरराष्ट्रीय जबाबदार्या असतात. – काही विवशताही असते. शाहीर अमर शेख यांनीही पक्षत्याग केला – अण्णा भाऊंच्या हलाखीबद्दलदेखील काही जण आंबेडकरवादी ‘पक्षा’ला दोष देत असतात. अण्णा भाऊंचं साहित्य मी सतत वाचत असे.
१९५८ साली पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन अण्णा भाऊ साठे यांच्या हस्ते झाले. बौद्ध साहित्य परिषदेच्या अप्पासाहेब रणपिसे आणि भाऊसाहेब अडसूळ या कार्यकर्त्यांनी ते आयोजित केले होते… त्यातच त्यांचे ते सुप्रसिद्ध भाष्य त्यांनी केले. ‘‘पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर उभी नसून श्रमिकांच्या तळहातावर आहे.’’
‘ज्याचं जळतं त्याला कळतं’ हे खरं आहे. १९६८ साली आमचे मित्र बाबूराव भारस्कर काँग्रेस पक्षातर्फे निवडून आले. ‘समाजकल्याण मंत्री’ झाले. त्यांनी मात्र चिराग नगरमध्ये आपली ‘लालबत्ती’ ची गाडी नेली आणि अण्णा भाऊ साठेंचा शासकीय गौरव झाला. मानधनही सुरू झाले. पण तुटपुंजे मानधन आणि लेखन मिळवण्यासाठी मिळणारी मदिरा अण्णा भाऊंना स्वस्थपणे जगू देत नव्हती.
अण्णाभाऊंचे परममित्र आर. के. त्रिभुवन यांनी त्यांची अत्यंत हृदयद्रावक आठवण आपल्या परिवर्तन साहित्य संमेलनातल्या भाषणात सांगितली. १७ जुलै १९६८ ला त्यांना मिळणार्या मानधनासाठी ते सचिवालयात गेले. त्यांचा ‘लाल रंग’ हा क्रांतीचा, रक्ताचा, बलिदानाचा आहे, हे अण्णाभाऊंना माहीत होतं, पण शासकीय फायलीवर जेव्हा लालरंगाची पट्टी बसते तेव्हा तो रंग अडवायचा, सडवायचा, रडवायचा असतो हे त्यांना माहीत नसावे. ते सचिवालयात गेले. बहुतेक अनेक टेबलांवरून त्यांना इकडे तिकडे जावे लागले असावे. ते शेवटी मोठ्याने ओरडले, ‘आज मला अर्धे तरी मानधन द्या !’ हा काळकभिन्न माणूस कसला मान आणि कसलं धन मागतो ?…’ अनेकांच्या ‘माना’ आम्ही या फायलीत करकचून बांधल्या आहेत… आम्हाला ‘धना’चा वाटा मिळाल्याशिवाय आम्ही लेखणी उचलत नाही !… अण्णा भाऊंना मानधन मिळाले नाही. रात्री घरी जाऊन झोपले – उपाशी पोटीच मरण कवटाळले !
अण्णाभाऊंच्या निधनानंतर काही दिवसांत मी मुंबईला आलो – रात्री मुंबई सेंट्रल एस.टी. स्थानकावर शाहीर अमर शेख यांची गाठ पडली. ते अहमदनगर गाडीने चालले होते. शाहीर अमर शेख म्हणजे क्रांतीचा धगधगता डोंगर… त्यांच्या तोंडून गीते ऐकताना देहाचे कान व्हावेत असे होते… ‘पॉल रॉबसन’ या जागतिक कीर्तीच्या गायकाबरोबरच त्यांच्या गायनाची कुळी सांगता येईल. सुंदर चेहरा, लांबसडक केस, बंगाली धोतर आणि रेशमी झब्बा – हातात एक छोटी चांदीची कुर्हाड असे. ते रूबाबदार व्यक्तिमत्व होते. माझी त्यांची ओळख होतीच – मी माझी बॅग गाडीच्या वरच्या जाळीवर ठेवायला लागलो तोच, ‘रतनलाल, सांभाळा, पिशवीत अण्णाभाऊ आहेत !’’ ते म्हणाले. शाहीर अमर शेख यांच्या सोबत त्यांनी एका रेक्झीनच्या पिशवीत अण्णा भाऊंची रक्षा घेतली होती. ती ते त्यांच्या नगरच्या कलाभूमीत घेऊन चालले होते !
रात्रभर शाहीर अमर शेख, केशवसुत, अण्णाभाऊ यांच्याविषयी बोलत राहिले, त्यांना आपल्या मित्राचा वियोग फारच जाणवत होता. काही वेळाने समोर एक प्रौढ स्त्रीला रडताना पाहून त्यांनी विचारपूस केली – तिला दिलासा दिला – त्यांचे ते माणुसकीचे ओथंबलेले भावदर्शन मी आजही विसरू शकत नाही.
काही दिवसांनंतरच एका अपघातात शाहीर अमर शेख यांचा दुःखद अंत झाला. शेवटी मित्राची ओढ असतेच ना ?
परिवर्तनशील कलावंत
कला – साहित्य क्षेत्रांत अनेक पुरोगामी परिवर्तनशील समतेच्या बाजूने लढणारे कलावंत साहित्यिक कार्य करीत होते. २० व्या शतकातील भारताचा उर्दू शायर तर क्रांतीचीच गीते गात होता. केरळ, बंगालमध्ये साहित्यिक कलावंत नाटककार शोषित जनतेची बांधिलकी स्वीकारून कार्य करीत होते. भारतात ‘जात’ नावाचे भीषण वास्तव आहे हे कार्ल मार्क्सला माहीत नव्हते. प्रत्येक महापुरुषाला त्याच्या जातीने वेढलेले असते. कधी तर आपला माणूस ‘मोठा’ झाला हीच त्यांना गौरवाची गोष्ट वाटते. अण्णा भाऊंच्या निधनानंतर ‘मातंग’ समाजाला आपला नायक हवा होता किंवा सत्ताधीशांना, आंबेडकरवाद्यांना शह-काटशह देण्यासाठी दैवत हवे होते. ठिकठिकाणी त्यांचे पुतळे उभे राहू लागले. अण्णा भाऊंच्या गौरवसभेत त्यांचे ‘साम्यवादी असणं’ हे ‘जाता जाता’ सांगितलं जाऊ लागलं ! कम्युनिस्टांनी त्यांना कसा त्रास दिला – किंवा ते कसे हालाखीत वारले हे सांगितलं जातं. दलित शोषित समाजाला आपले मित्र कोण, शत्रू कोण हे ठरवायला उशीर लागतो… आमचे छोटे छोटे स्वार्थ, छोटी छोटी दुकाने प्रिय असतात…. महाराष्ट्रातून कुणी आंबेडकरवादी परप्रांतात जाऊन तिथे स्वतःला गाडून घेऊन चळवळ करताना दिसत नाही. साम्यवादी तर काही प्रांतातच आपले बळ एकत्रित करून आहेत.
रोकडे तत्त्वज्ञान
आज साम्यवादी रशियात साम्यवादी पक्ष पराभूत झाला आहे. एक महासत्ता छिन्नभिन्न झाली आहे. ‘चीन’ आपल्या धोरणाने अजूनही शक्तिशाली आहे. भारतात लोकशाही मार्गाने ज्योति बसू यांना पंतप्रधान होण्याची दोनदा संधी मिळाली – पण त्यांनी आपल्या सहकार्यांच्या दडपणाने नाकारून हिमालयाएवढी चूक केली… अण्णा भाऊंचे ‘लाल तारा निळे आकाश’ हे समाजवादी सत्य वास्तवात उतरले नाही. भांडवलशाहीने ‘माणिक’ गिळले आहे, आता हे जग घाव घालून बदलायचे कसे ? या सहस्रकांचे अप्रतिम भाष्यकार ‘ओशो’ म्हणतात, ‘आतापर्यंत कोणत्याही तत्त्वज्ञानाने माणसाला प्रत्यक्षात काही दिले नाही. समतेच्या या विचारसरणीने प्रत्येकाला काही ना काही प्रत्यक्ष देण्याचा प्रयत्न केला. न्याय द्यावा, प्रेम द्यावे… म्हणजे प्रत्यक्ष काय द्यावे? युद्धाचा धोका पत्करूनदेखील या तत्त्वज्ञानाचे रक्षण करायला हवे.’’ आपल्या एका लेखात केशवराव धोंडगे मार्मिकपणे म्हणतात, ‘‘मानवी संस्कृतीच्या उषःकालापासून अनेक धर्मांना, प्रेषितांना, महंतांना, पंथांना, मठांना, पीठांना शेकडो नव्हे तर हजारो वर्षे दिली व त्यांनी घेतली ! केली कुण्या धर्माने वा पंथाने गरिबांची पिळवणूक दूर ? उलट जातिवर्णव्यवस्थेने विविध विषमतेचे रक्षणकर्तेच हे धर्म पंथ बनले आहेत.’’ अण्णा भाऊ साठे यांनी धनदांडग्यांची आणि जातीय लांडग्यांची सत्ता नाकारली होती. त्यांनी अविरतपणे हा लढा दिला. आपली लेखणी, वाणी आणि करणीने मानवी स्वातंत्र्याची ध्वजा उंच फडकावली. मराठी वारणेचे हे पाणी रशियाच्या वोल्गा नदीपर्यंत भिडले… !
आज मराठी साहित्याचे ‘वर्तमान’ भूतकाळातच रमत आहे. महा कादंबरीचे प्रचंड विषय समोर असूनही, परम करुणेचा मानवी विचार नसल्याने अगतिकता दिसते आहे. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते लेखक पाहिले तर त्यांत समतावादी विचारवंतच अधिक असतात… कुणी काहीही म्हटले तरी बांधिलकीशिवाय खर्या साहित्याची निर्मिती होत नाही. अण्णा भाऊ साठे यांच्यात तसे प्रचंड सामर्थ्य होते.
मध्यंतरी वाटेगावला त्यांचे घर पाहून आलो. रामदास आठवले यांच्या कार्यकर्त्यांनी ते घर बांधून दिले असं त्यांचे बंधू शंकर भाऊ म्हणाले. रशियात मॅक्झिम गोर्कीचे घर जपून ठेवण्यात आले आहे. आपणही हा ठेवा जपायला हवा. ‘प्यासा’ चित्रपटात गुरुदत्तच्या तोंडी एक काव्य आहे, ‘‘इस तहजीब से मुझे नफरत है जो जिंदो को जलाती है और मुर्दो को पूजती है|’’ अण्णा भाऊंचे बंधू शंकर भाऊ साठे मुंबईला डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये मला भेटायला आले. कुठल्या तरी नगरपालिकेने पाच लाख रुपये खर्चून अण्णा भाऊंचा पुतळा उभा केला होता. त्याच्या उद्घाटनासाठी शंकर भाऊंना बोलावले होते. ते म्हणाले, ‘‘माझ्याकडे तिथं जायला एस.टी.चे भाडे नाही !’’
फ्रान्सच्या रोझिनी या कवीची अशीच गोष्ट सांगतात. एकदा त्याचे चाहते त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, ‘‘आपण आमचे महाकवी; पॅरिसच्या चौकात आम्ही आपला पुतळा बसवू इच्छितो…’’
‘‘ माझ्या पुतळ्याला किती खर्च येईल ?’’ नेरोझिनी विचारले.
‘‘एक लाख फ्रँक !’’ चाहते म्हणाले.
‘‘एक लाख फ्रँक ? त्यातले पन्नास हजार फ्रॅंक मला द्या. मीच जाऊन त्या ठिकाणी उभा राहतो !’’ रोजिनी म्हणाला…
दिवसेंदिवस पुतळे वाढताहेत आणि विचार मरताहेत…
हे होऊ नये म्हणून… मन मनाची मशागत करा… अण्णा भाऊंचे विचार पेटतेच राहू द्या…
– रतनलाल सोनग्रा
(बॅ. गाडगीळ प्रसारण मंत्री होते. त्यांनी मुंबई दूरदर्शनचे श्री. वसंत भामरे यांना अण्णा भाऊंच्या जीवनावर एक वृत्तचित्र बनविण्यास सांगितले. वसंतराव भामरे यांनी ती चित्रपटकथा लिहून घेतली. पुढे बॅ. साहेब मंत्री राहिले नाहीत… वृत्त चित्रपट निघाला नाही. तीच चित्रपट कथा प्रकाशित करीत आहोत.)